कोल्हापूर- एका खासगी कंपनीची मुंबईहून कोल्हापूरकडे येणारी कार अडवून दरोडेखोरांच्या टोळीने फिल्मी स्टाईलने दरोडा टाकला होता. यामध्ये त्यांनी कारमधून तब्बल १ कोटी १८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या दरोड्यातील पाच जणांना कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात गजाआड केले आहे. सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही दरोड्याची घटना घडली होती.
मुंबईतील लक्ष्मी गोल्ड बुलियन या कंपनीने १ कोटी १८ लाख किमतीचे सोने आणि रक्कम इर्टिका गाडीने कोल्हापूरला पाठविले होते. कोल्हापूरच्या राजेंद्रनगर परिसरात ही इर्टिका गाडी पैसे आणि सोनं घेऊन येत होती. त्याचवेळी मागावर असलेल्या चोरट्यांनी इर्टिका गाडीसमोर आपली स्विफ्ट गाडी लावून तिला थांबविले. त्यानंतर स्विफ्ट गाडीतून दोघेजण उतरले. त्यांनी दहशत माजवत इर्टिका गाडीवर ताबा घेतला. त्यावेळेस या गाडीत तब्बल ५२ लाखाची रोख रक्कम आणि ६० लाख किमतीचे दोन किलो सोन्याचे दागिने होते. त्याबरोबर या कारमध्ये कंपनीचे तीन कर्मचारी सुद्धा होते. चोरट्यांनी आधी गाडीतील तिघांना जबरदस्ती करुन गाडीतच ठेवले. त्यानंतर चोरट्यांनी तिघाही कर्मचाऱयांना वेगवेगळ्या ठिकाणी सोडले. त्यामुळे पुढे काय झाले याची माहिती आधी सोडलेल्या कर्मचाऱ्यांना नव्हती. यामुळे पोलिसांपुढे चोरट्यांचा माग काढण्याचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या 24 तासातच चोरट्यांना जेरबंद केले आहे.