वॉशिंग्टन : चिनी बलूननंतर अमेरिकेने शनिवारी आणखी एक संशयास्पद उडणारी वस्तू खाली पाडली. ही संशयास्पद वस्तू कॅनडाच्या आकाशावर उडत होती. अमेरिका व कॅनडाने संयुक्त ऑपरेशनद्वारे तिला नष्ट केले. अशाप्रकारची आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे. यामुळे आता अमेरिकेच्या हवाई क्षेत्रातील धोका वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
अमेरिकेच्या लढाऊ विमानाने वस्तू पाडली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या आदेशानुसार शनिवारी उत्तर कॅनडावर उडणारी ही अज्ञात वस्तू अमेरिकेच्या लढाऊ विमानाने खाली पाडली. या आधी 4 फेब्रुवारी रोजी अलास्का मार्गे अमेरिकेत प्रवेश केलेले चीनी बलूनही अमेरिकेने पाडले होते. यानंतर शुक्रवारीही अलास्कावर उडणारी एक वस्तू खाली पाडण्यात आली होती.
चिनी बलूनपेक्षा लहान :कॅनडाच्या संरक्षण मंत्री अनिता आनंद यांनी सांगितले की, सुमारे 40,000 फूट उंचीवर उडणारी ही दंडगोलाकार वस्तू यापूर्वी खाली पाडण्यात आलेल्या चिनी बलूनपेक्षा लहान आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पंतप्रधान ट्रुडो यांनी शनिवारी संयुक्तपणे तिला वस्तू पाडण्याचा निर्णय घेतला. आनंद म्हणाल्या, 'ही वस्तू बेकायदेशीरपणे कॅनडाच्या हवाई क्षेत्रात घुसली होती. प्रवासी विमानांसाठीही ती धोक्याची होती. कॅनडा-युनायटेड स्टेट्स सीमेपासून सुमारे 100 मैल अंतरावर मध्य युकॉनमधील कॅनडाच्या प्रदेशात ही वस्तू पाडण्यात आली. कॅनडावर उडणारी वस्तू चीनमधून आली की नाही हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
आठवड्यातील तिसरी घटना :शनिवारची कारवाई ही गेल्या आठवडाभरातील तिसरी घटना आहे. राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या आदेशानुसार शुक्रवारी संशयास्पद वस्तूचा मागोवा घेण्यात आला. अलास्का कमांड आणि अलास्का नॅशनल गार्ड, एफबीआय आणि स्थानिक कायदा अंमलबजावणीच्या पथकांनी या ऑपरेशनमध्ये एकत्र काम केले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, थंड वारा, बर्फ आणि मर्यादित दिवसाचा प्रकाश यासह प्रतिकूल आर्क्टिक हवामानात ही कारवाई करण्यात आली. या वस्तूबद्दल त्यांच्याकडे अधिक तपशील नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे चिनी बलुनबत असा दावा करण्यात आला होता की, तो बऱ्याच दिवसांपासून निरीक्षण करत होता. चीनने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार तो बलुन हवामान निरीक्षणाशी संबंधित होता, जो आपला रस्ता भटकला होता.
हेही वाचा : Raja Chari Indian American Astronaut : भारतीय वंशाचे अंतराळवीर राजा चारी अमेरिकन हवाई दलाचे ब्रिगेडीयर जनरल म्हणून नामांकीत