सिंगापूरTharman Shanmugaratnam : भारतीय वंशाचे थर्मन षणमुगररत्नम सिंगापूरचे नवे राष्ट्रपती बनले. शनिवारी जाहीर झालेल्या निकालानुसार, त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत ७०.४ टक्के मतांनी विजय मिळवला. षण्मुगररत्नम यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीत दोन चिनी वंशाच्या उमेदवारांचा पराभव केला. विद्यमान राष्ट्रपती मॅडम हलीमह याकोब यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ १३ सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्या सिंगापूरच्या पहिल्या महिला आणि एकूण आठव्या राष्ट्रपती होत्या.
सिंगापूरचे तिसरे भारतीय वंशाचे अध्यक्ष : ६६ वर्षीय थर्मन षण्मुगररत्नम सिंगापूरचे तिसरे भारतीय वंशाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. 'सिंगापूरच्या लोकांनी दिलेल्या भरघोस समर्थनामुळे मी खरोखरच नम्र झालो आहे. हे एक मत केवळ माझ्यासाठी नाही, तर ते सिंगापूरच्या भविष्यासाठी आहे', असं ते म्हणाले. 'माझी मोहीम आशावाद आणि एकतेवर आधारित होती. सिंगापूरकरांनाही तेच हवं आहे', असं ते म्हणाले.
तमिळ वंशाचे सिंगापूरीयन आहेत : २५ फेब्रुवारी १९५७ रोजी सिंगापूरमध्ये जन्मलेले थर्मन हे तमिळ वंशाचे सिंगापूरीयन आहेत. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केलीय. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. थर्मन षण्मुगररत्नम यांनी २००१ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ सत्ताधारी पीपल्स अॅक्शन पार्टी (PAP) सोबत विविध मंत्री पदांवर काम केलं आहे.