अंकारा -पश्चिम तुर्कीमधील इझमिर प्रांतात झालेल्या या भूकंपातील मृतांचा आकडा 114 झाला आहे. तर 1 हजार 35 लोक जखमी झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. यापूर्वी प्राधिकरणाने सांगितले होते की, 107 लोकांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.
सिन्हुआ या वृत्तसंस्थेनुसार, आपत्ती व आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएफएडी) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जखमींपैकी 137 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एएफएडीचे प्रमुख मेहमेट गुल्लोओग्लू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाहीर केले आहे की, कोसळलेल्या सर्व 17 इमारतींमधील बचावकार्य पूर्ण झाले आहे.
'वन रेंट वन होम' मोहीम
इझमिरच्या महापौरांनी 'वन रेंट वन होम' नावाची मोहीम सुरू केली आहे. भूकंपग्रस्त आणि बेघर झालेल्या लोकांना राहण्यासाठी घरे देणे हा याचा उद्देश आहे. 'ज्या नागरिकांना भाड्याने राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून हवी असेल किंवा आपापली घरे उघडायची आहेत, ते ऑनलाईन नोंदणी करू शकतात,' असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.