काबुल -अमेरिकेच्या शिष्टमंडळाशी सुरू असलेली शांतता चर्चा काही काळासाठी स्थगित झाल्याच्या पार्श्वभूमीवर, तालिबानने अफगाणिस्तानमधील हल्ले वाढवले आहेत. तालिबान या अतिरेकी संघटनेची, कतारची राजधानी असलेल्या दोहामधील अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबत शांतता चर्चा सुरू होती. मात्र, काराबाघ जिल्ह्यातील घझनी प्रांतामध्ये झालेल्या एका अतिरेकी हल्ल्यानंतर ही चर्चा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. या हल्ल्यात २३ सुरक्षारक्षकांना आपला जीव गमवावा लागला होता.
तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच, शनिवारी झालेल्या या हल्ल्यानंतर, बंडखोरांनी त्या रात्रीच आणखी ३२ जवानांनाही ठार मारल्याचे मुजाहिद याने स्पष्ट केले.
ऑक्टोबर २०१८ मध्ये अमेरिकेने तालिबानसोबत शांतता चर्चेला सुरुवात केली होती. मात्र, काबुलमध्ये झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात १० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये एका अमेरिकी जवानाचादेखील समावेश होता. या हल्ल्याचा तालिबानशी संबंध असल्याचे लक्षात आल्यानंतर, शांतता चर्चांना स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर ७ डिसेंबरनंतर पुन्हा चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र, ११ डिसेंबरला बाग्राम जिल्ह्यातील अमेरिकेच्या लष्करी तळावर एक ट्रक-बॉम्ब हल्ला झाला. यामध्ये आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यांपैकी सहा हे हल्लेखोर होते. या हल्ल्यात जवळपास ७० लोक जखमी झाले होते. तसेच, १२ हून अधिक अमेरिकी जवान आणि त्यांचे स्थानिक सहकारी यांची आपण हत्या केल्याचेही तालिबानने जाहीर केले. त्यामुळे, या चर्चा पुन्हा थांबल्या आहेत.
तालिबानचा कतारमधील प्रवक्ता झुहाईल शाहसीन याने बाग्राममधील हल्ल्याचे समर्थन केले आहे. दोन्ही बाजूंनी चर्चेतून जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत आपण हल्ले सुरुच ठेवणार असल्याचे त्याने म्हटले आहे. वरती उल्लेख केलेल्या घटनांव्यतिरिक्त, शुक्रवारपासून वाढलेल्या या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत १० सामान्य नागरिक, जवळपास १२हून अधिक सुरक्षा रक्षक आणि ३० हून अधिक जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
हेही वाचा : न्यूझीलंड : ज्वालामुखीच्या उद्रेकात १६ जण ठार