महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पगारवाढीसाठी जर्मनीतील रेल्वे चालक जाणार संपावर

पगारवाढीच्या मागणीवरून जर्मनीतील रेल्वे चालक मंगळवारी रात्रीपासून देशव्यापी संपावर जाणार आहेत. त्यामुळे जर्मनीतील दळणवळण व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पगारवाढीसह कोरोना बोनसची रेल्वे चालकांची मागणी आहे.

पगारवाढीसाठी जर्मनीतील रेल्वे चालक जाणार संपावर
पगारवाढीसाठी जर्मनीतील रेल्वे चालक जाणार संपावर

By

Published : Aug 10, 2021, 4:58 PM IST

बर्लिन : पगारवाढीच्या मागणीवरून जर्मनीतील रेल्वे चालक मंगळवारी सायंकाळपासून देशव्यापी संपावर जाणार आहेत. त्यामुळे जर्मनीतील दळणवळण व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पगारवाढीसह कोरोना बोनसची रेल्वे चालकांची मागणी आहे.

शुक्रवारपर्यंत संप, पगारवाढीची मागणी

मंगळवारी सायंकाळी 7 वाजेपासून हा संप सुरू होणार असल्याचे जीडीएल संघटनेचे प्रमुख क्लॉस वेसेल्स्काय यांनी सांगितले. कार्गो रेल्वेचे चालक सायंकाळी सात वाजेपासून, प्रवासी रेल्वेचे चालक बुधवारी पहाटे दोन वाजेपासून या संपात सहभाग नोंदवतील. शुक्रवारी पहाटे दोन वाजेपर्यंत हा संप सुरू राहील. 3.2 टक्के पगारवाढीसह एकाच वेळेस 600 युरोंच्या कोरोना बोनसची रेल्वे कर्मचारी संघटनेची मागणी आहे.

रेल्वे कंपनीने मागण्या फेटाळल्या

जर्मनीतील रेल्वे ऑपरेटर ड्युश बाह्नने या मागण्या फेटाळून लावल्या आहेत. कोरोना संकट काळात अब्जावधींचे नुकसान झाल्याचे सांगत अलिकडेच बसलेल्या पुराच्या तडाख्यातही मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळांचे आणि इतर संपत्तीचे नुकसान झाल्याचे कारण ड्युश बाह्नने दिले आहे.

पर्यटकांना बसणार फटका

सध्या जर्मनीत सुट्यांचा कालावधी असून अनेक जण पर्यटन आणि प्रवासासाठी बाहेर आहेत. काही जणांनी आधीच रेल्वेचे तिकिट बूक केलेले असून त्यांना या संपाचा फटका बसण्याचा अंदाज आहे. 2014 ते 2015 दरम्यान जीडीएल संघटना आठ वेळेस देशव्यापी संपावर गेली होती.

हेही वाचा -"हे युद्ध आता अफगाणिस्तानचे आहे", पेंटागॉनची तालिबानवर हवाई हल्ले न करण्याची भूमिका

ABOUT THE AUTHOR

...view details