नवी दिल्ली/पॅरिस- बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित असे राफेल फ्रान्स सरकारने भारताला सुपुर्द केले आहे. पहिले राफेल मिळाल्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी निमित्त राफेलचे शस्त्रपूजन केले. त्यानंतर पहिली सफर घेतली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि वायू सेना प्रमुख बी. एस धनोआ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पहिले विमान घेण्यासाठी जाणार फ्रान्सला गेले आहेत. फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर हवाईदलप्रमुख राफेल लढाऊ विमानाच्या हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. यावेळी ते म्हणाले, भारतीय हवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आहे. राफेल या लढाऊ विमानाने आपण आणखी मजबूत होणार आहोत, असा माझा विश्वास आहे. आपले हवाई वर्चस्व वाढण्याला चालना मिळून खात्रीने प्रदेशात शांतता आणि सुरक्षा निर्माण होणार आहे. राफेलचा अर्थ धुळीचे वादळ असा होतो. राफेल नावाप्रमाणे विमान वादळ निर्माण करेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी हवाईदलप्रमुख हरजीत सिंह अरोरा उपस्थित होते.
राजनाथ सिंह यांनी राफेलमधून उड्डाण करण्यापूर्वी त्याची शस्त्रपूजा करत ओम लिहिले. त्यानंतर फुले आणि श्रीफळ वाहिले.
- पहिले हवाईदल प्रमुख राकेश भदौरिया यांच्या स्मरणार्थ पहिल्या राफेलचे नाव आरबी ००१ ठेवण्यात आले आहे. ३६ राफेल लढाऊ विमाने भारताला पुढील वर्षी मिळणार आहेत. सध्या, राफेलसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांवर देशात काम करण्यात येत आहे.
- राफेल या लढाऊ विमानाची मारकक्षमता जगात सर्वात अधिक भेदक मानली जाते.
- राफेल लढाऊ विमानांनी भारतीय वायू सेनेची ताकद आणखी वाढणार आहे. राफेल विमानांची पहिली बॅच हरियाणातील अंबाला येथील वायू सेना तळावर सेवेत दाखल होणार आहे.
- २०१६ मध्ये फ्रान्ससोबत भारताने ५८ हजार कोटींचा ३६ लढाऊ राफेल विमानांचा करार केला होता. राफेल लढाऊ विमाने खरेदी प्रकरणी विरोधकांनी सरकारवर सतत टीका केली आहे.
आधीच्या योजनेनुसार पहिले राफेल विमान सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार होते. मात्र, त्यामध्ये बदल करण्यात आला. ८ ऑक्टोबर हा दिवस वायू सेना दिवस म्हणूनही साजरा केला जातो. तसेच आज दसरा सणही आहे. त्यामुळे या दिवसाची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तान सीमेपासून फक्त २२० किमी अंतरावर असल्यामुळे अंबाला एअर फोर्स स्टेशनला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कोणत्याही आगळीकीला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज होणार आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील हसीमारा वायू सेनेच्या तळावर राफेल लढाऊ विमानांची दुसरी बॅच तैनात केली जाणार आहे.