लंडन : ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोनावरील लस ही पुढील तीन महिन्यांमध्ये बाजारात आणली जाऊ शकते, असे एका अहवालात सांगण्यात आले आहे. सध्या या लसीच्या जगभरात चाचण्या सुरू आहेत.
टाइम्सच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, केवळ तीन महिन्यांमध्ये ही लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध केली जाऊ शकते. यामुळे इंग्लंडमधील प्रत्येकाला लवकरात लवकर याचा डोस देता येणे शक्य होणार आहे. या लसीवर संशोधन करणाऱ्या संशोधकांना आशा आहे की, २०२१ सुरू होण्यापूर्वीच या लसीला मान्यता प्राप्त होईल. ज्यामुळे, सहा महिन्यांच्या आत प्रत्येक व्यक्तीला याचा डोस उपलब्ध करून देता येईल.
या लसीचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीला परवानगी मिळाल्यानंतर केवळ सहा महिन्यांमध्ये किंवा त्याहून कमी वेळात देशातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी एक-एक डोस तयार करता येऊ शकतो.
युरोपियन मेडिसिन एजन्सीने (एमईए) अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठामार्फत तयार करण्यात आलेल्या लसीच्या चाचणीचा अहवाल तपासण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच चाचण्या आणि अहवालाची तपासणी ही एकाच वेळी करण्यात येत आहे. लवकरात लवकर लस तयार व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एमईएने सांगितले.
हेही वाचा : 'आगामी काळ खऱ्या परीक्षेचा...'; डोनाल्ड ट्रम्प यांचे टि्वट