हॅनोई - व्हिएतनाम देशात सध्या 'मोलवे' वादळाने थैमान घातले आहे. वादळामुळे पूर आणि दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या असून या नैसर्गिक आपत्तीत आत्तापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० जण बेपत्ता झाले असून ६७ नागरिक जखमी झाल्याची माहिती आपत्ती निवारण पथकाने दिली.
मोलवे वादळाने हाहाकार
देशातील विविध प्रांतात 'मोलवे' वादळाने थैमान घातले आहे. क्वांग नाम, नेह अन, डाक लाक आणि गाई लाई प्रांतात शुक्रवारपर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, आज मृतांच्या संख्या वाढून २७ झाली आहे. वादळ, पूर आणि दरड कोसळल्याचे ६३ पुलांचे आणि महामार्गांचे नुकसान झाले आहे. आपत्ती निवारण पथके मदतीसाठी रवाना झाली आहेत.
१० हजारांपेक्षा जास्त जवान मदतीसाठी
शोध आणि बचावकार्यासाठी १० हजारांपेक्षा जास्त लष्कराचे जवान पाठविण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत आपत्तीनिवारण पथकाचे जवान आणि पोलीसही आहेत. मोलवे वादळाने देशात मोठे नुकसान केले आहे. मागील २० वर्षातील हे सर्वात भीषण वादळ आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिण्याचे पाणी, अन्न, औषधे यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.