महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'आणखी आत्मघातकी हल्ले घडवा, पाक लष्कराची काश्मीरींना चिथावणी'

पाकिस्तानी लष्कर आता काश्मीरींना अधिकाधिक आत्मघातकी हल्ले घडवून आणण्यास उघडपणे सांगत आहे. या बाबी पसंत नसलेले लोक मानवाधिकारासाठी शांततापूर्वक निषेध करू लागले, तर हे मुल्ला लोक त्यांच्यावर हल्ले घडवून आणतात.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद

By

Published : Mar 12, 2019, 3:07 PM IST

जिनिव्हा - पाकव्याप्त काश्मीरमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पुलवामा हल्ल्याचा निषेध केला. तसेच, इस्लामाबादला पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची जोरदार मागणी केली.

सोमवारी यूएनएचआरसीच्या ४० व्या सत्रातील कार्यक्रमात दहशतवादी आणि कट्टरतावादाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केवळ काही विशिष्ट प्रदेश नव्हे; तर, संपूर्ण जगावरच याचे सावट आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांनी असे मत व्यक्त केले. युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे (यूकेपीएनपी) अध्यक्ष सरदार शौकत अली काश्मीरी यांनी पाकिस्तानी लष्कराला दहशतवाद्यांचा वापर करून भारतासोबत छुपे युद्ध सुरू केल्याबद्दल दोष दिला.

'पाकिस्तानी लष्कर आता काश्मीरींनाअधिकाधिक आत्मघातकी हल्ले घडवून आणण्यास उघडपणे सांगत आहे. सेवानिवृत्त पाकिस्तानी लष्कर प्रमुख साध्या हत्यारांचा आणि शस्त्रांचा वापर करण्याऐवजी या मार्गाचा वापर करण्यास सांगत आहेत. ही परिस्थिती धोकादायक आहे. आमच्या राज्यात विविध संस्कृती, धर्म आणि वंशांचे लोक राहात असून आम्ही शांतताप्रिय आहोत. पाकिस्तान अशाच पद्धतीने कट्टरतेचा पुरस्कार करत राहिला तर, ख्रिश्चन, बौद्ध, हिंदू, मुस्लीम धर्मांच्या आधारावर आमच्या राज्याचे हजारो तुकडे होतील. कट्टरता कोणत्याच मानवाच्या पक्षात नाही. मात्र, दुर्दैवाने पाकिस्तानने बुद्धी गहाण ठेवून दहशतवादाचा आश्रय घेतला आहे. यासाठी ते धर्माचा वापर करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानचीच अवस्था वाईट झाली आहे,' असे शौकत अली म्हणाले.

'दहशतवादी आणि मुल्लांनी पाकिस्तानच्या जनतेचा आवाज दाबला आहे. का? या बाबी पसंत नसलेले लोक मानवाधिकारासाठी शांततापूर्वक निषेध करू लागले, तर हे मुल्ला लोक त्यांच्यावर हल्ले घडवून आणतात. त्यामुळे आम्ही अडचणीत सापडलो आहोत. आम्ही यूएनएचसी आणि जागतिक संघटनांना यात हस्तक्षेप करून पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यास भाग पाडावे,' असेही शौकत अली यांनी म्हटले.

'आम्ही मागील ७१ वर्षांपासून हल्ले आणि प्रतिहल्ले पाहिले आहेत. आता पुलवामा हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. दोन्ही देशांकडे आण्विक शस्त्रे असल्याने संपूर्ण जगासमोर भीती निर्माण झाली आहे. आणखी काहीतरी घडले तर, संपूर्ण जगासमोर संकट उभे राहील,' असे दुसरे सामाजिक कार्यकर्ते मिजफार हसन म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details