इस्लामाबाद -नोकरी देतो म्हणून बनावट फोन करून महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांने धाडस करत आपल्या मुलीलाच सावज म्हणून धाडले. आरोपी मुलीला घेवून जाणार इतक्यात पोलिसांनी छापा मारत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे बलात्कार करणाऱ्यांची साखळीच पोलिसांनी उद्ध्वस्त केली. या जिगरबाज पोलीस अधिकाऱ्याचे सगळीकडून कौतुक होत आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात ही घटना घडली. या पोलीस अधिकाऱ्याला सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणीही सिंध सरकारने केली आहे.
आरोपी महिलांना कसे ओढायचे जाळ्यात
सिंध प्रांतातील कश्मोर येथे काही व्यक्ती महिलांना नोकरी देण्याच्या बहाण्याने फोन करून बोलावून घेत. नंतर त्यांच्यावर अत्याचार करून सोडून देत. नोकरी देण्याच्या बहाण्याने आरोपींनी कराची शहरातील एका महिलेला बनावट कॉल केला होता. नोकरीच्या आशेने ही महिला कराची शहरातून काश्मोर येथे आपल्या पाच वर्षाच्या मुलीला घेवून गेली होती. मात्र, तेथे तिच्यावर आरोपींनी सतत चार दिवस बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी महिलेला आणि मुलीला दुसऱ्या ठिकाणी नेले. तेथेही आणखी चार दिवस बलात्कार केला.
मात्र, एवढ्यावर आरोपींचे समाधान झाले नाही. त्यांनी पीडित महिलेला दुसऱ्या एका महिलेची व्यवस्था करण्याची मागणी केली. तरच तुला सोडू, अशी धमकी दिली. त्या बदल्यात महिलेच्या पाच वर्षीय मुलीला आरोपींनी ठेवून घेतले. पीडित महिलेची सुटका झाल्यावर तिने पहिले पोलीस ठाणे गाठून घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी योजना आखली.
पोलीस अधिकाऱ्याची धाडसी योजना
कश्मोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मोहम्मद बुरीरो यांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी शक्कल लढवली. मात्र, यामध्ये धोकाही तितकाच होता. बुरीरो यांनी आपल्या मुलीला आरोपींकडे धाडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या बदल्यात लहान मुलीची सुटका आरोपी करणार होते. मात्र, त्याच वेळी आरोपींना पोलीस पकडणार, असे नियोजन करण्यात आले. एका स्थानिक बागेत भेटून मुलीला सोडण्याचे आरोपींनी मान्य केले. मात्र, पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला होता. ठरल्यानुसार आरोपींनी पाच वर्षाच्या मुलीची सुटका केली. त्याबदल्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलीला घेवून निघाले. मात्र, पोलीस आरोपींच्या मागावर होते.पोलिसांनी झडप मारून आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी आरोपींनी गोळीबारही केला. प्रत्युत्तर दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक आरोपी ठार झाला. मात्र, पोलिसांनी एका मोठ्या गुन्हेगारी साखळीचा पर्दाफाश केला.
बुरिरो आणि त्यांच्या मुलीच्या धाडसाचे सिंध प्रांतात कौतुक होत आहे. या पोलीस अधिकाऱ्याला सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणीही सिंध प्रांताने केली आहे. सिंध सरकारने बुरिरो यांच्या मुलीच्या धाडसाचेही कौतुक केले आहे.