मुंबई - कोरोना लसीकरणासाठी भारताने शेजारी देशांसह मित्र देशांना लसीचा पुरवठा सुरू केला आहे. म्यानमार, सेशल्स आणि मॉरिशस या देशांना आज (शुक्रवार) सीरम कंपनीच्या 'कोव्हिशिल्ड' लसीचा पुरवठा करण्यात आला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून ही लस या देशांना पाठविण्यात आली. नेपाळ, भूटान, अफगाणिस्तान, बांगलादेशलाही भारताकडून कोरोना लस देण्यात येत आहे.
विशेष विमानाने लस रवाना -
सकाळी साडेसहाच्या सुमारास म्यानमारला विशेष विमानाने लस पाठवण्यात आली. तर मॉरिशस आणि सेशल्स या देशांना सकाळी ११ वाजता विमानाने लस पाठवण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ लाख लसींचे डोस म्यानमारला देण्यात आले आहेत. तर सेशल्सला ५० हजार डोस भारताकडून मिळणार आहेत. मॉरिशसला भारताकडून १ लाख कोरोना लसीचे डोस मिळणार आहेत.
व्हॅक्सिन मैत्री कार्यक्रमाअंतर्गत भारताची मदत
व्हॅक्सिन मैत्री कार्यक्रमाअंतर्गत भारताकडून शेजारी आणि मित्र देशांना लसीचा पुरवठा सुरू आहे. हिंदी महासागर प्रदेशात सेशल्स हा भारताचा विश्वासार्ह मित्र आहे. यातून भारताचे आणि सेशल्सचे मैत्रीपूर्ण संबंध दिसून येतात. हिंदी महासारग परिसरातील देशांच्या विकासासाठी 'सिक्युरिटी अॅन्ड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन' म्हणजेच सागर कार्यक्रम पंतप्रधान मोदींनी आखला आहे. सागर कार्यक्रम हे मोदींचे स्वप्न आहे. त्यामुळे भारताकडून सेशल्सला मदत करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.