बीजिंग -चीनच्या वुहान शहरातून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्गाचा कहर अजून सुरूच आहे. हुबेई प्रांताच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, या संसर्गामुळे मरणाऱ्यांचा आकडा आता 2 हजार 236 झाला आहे. याशिवाय, आणखी ४११ जणांना याची लागण झाली आहे. आता हा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल 75 हजार 465 झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराचे नाव आता COVID-19 केले आहे. यामध्ये मागील वर्षी डिसेंबर महिन्यात या विषाणूचा संसर्ग झाल्याचे सर्वांत प्रथम निदर्शनास आल्याचा उल्लेख आहे. या विषाणूचे संक्रमण जवळजवळ जगभरात पसरले आहे. चीनव्यतिरिक्त जगभरात याचे ९ बळी गेले आहेत.
राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग यांचे पाकला आश्वासन
कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळासाठी परिणाम होऊ शकत नसल्याचे चीनने म्हटले आहे. मात्र, जगभरात याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी चीनच्या विकासावर याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकत नसल्याचे मित्रदेश पाकिस्तानला आश्वासन दिले आहे.
सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. पाकिस्तान आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी चीनच्या भरवशावर आहे. आता चीनच्याही अर्थव्यवस्थेलाही कोरोना संक्रमणामुळे हादरा बसला आहे. चीन कोरोनाच्या संकटाशी एक महिन्याहून अधिक काळापासून झुंज देत आहे, अशा स्थितीत चीनने पाकिस्तानला अशा प्रकारे आश्वस्त करणे अचंबित करणारे आहे.
चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरसाठीही (सीपीईसी) पाकिस्तानला चीनच्या मदतीची गरज आहे. पाकिस्तानच्या कब्ज्यात असलेल्या काश्मीरमधून (पीओके- पाकव्याप्त काश्मीर) जाणारा हा कॉरिडॉर चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्हचा हा भाग आहे.
स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जिनपिंग यांनी पाकिस्तान-चीन आर्थिक भागीदारी आणखी वरच्या स्तरावर घेऊ जाण्यासाठीही चीनने कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. यामध्ये सीपीईसी सर्वांत महत्त्वाची पायरी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, कोरोना विषाणूविरोधात चीनची लढाई सकारात्मकरीत्या सुरू असल्याचेही जिनपिंग यांनी पाक पंतप्रधान इम्रान खान यांना सांगितले आहे.