वॉशिंग्टन डी. सी - मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमधील वाद वाढतच आहे. एकमेकांवर कुरघोड्या सुरुच आहे. आधीच तापलेल्या वातावरणात तैवानला शस्त्र पुरवठा करण्याचा निर्णय अमेरिकेने पुढे रेटला आहे. यास चीनचा पहिल्यापासून विरोध आहे. कारण तैवानला चीन कायमच आपला भाग मानत आला आहे. त्यामुळे तैवानमधील अमेरिकेचा हस्तक्षेप चीनला खुपत आहे.
दरम्यान, अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन या कंपनीला अमेरिकी सरकारने लढाऊ विमानांची निर्मिती करण्याचे कत्रांट दिले आहे. या कंत्राटाअंतर्गत कंपनी एफ-१६ ही अॅडव्हॉन्स फायटर जेटची निर्मिती करणार असून तैवानला त्याचा पुरवणार आहे. हे कंत्राट तब्बल ६ हजार २०० कोटी अमेरिकी डॉलरचे आहे. कंत्राटामध्ये कोणत्या देशाला लढाऊ विमाने देण्यात येणार आहेत, याचा स्पष्ट उल्लेख नाही. मात्र, ही विमाने तैवानलाच देण्यात येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ६६ लढाऊ विमाने तैवानला देण्यास मागील वर्षी ट्रम्प प्रशासनाने हिरवा कंदिल दाखवला होता. त्याची प्रक्रिया आता सुरु झाल्याचे दिसत आहे.