वॉशिंग्टन डी. सी - सोशल मीडिया साईट ट्विटरने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तीक ट्विटर खाते कायमचे बंद केले आहे. अमेरिकेतील संसदेत ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार घडवून आणण्यात आला. यासाठी ट्रम्प यांचे काही ट्विट आणि व्हिडिओ कारणीभूत असल्याचा ठपका ट्विटरकडून ठेवण्यात आला आहे. तसेच भविष्यातही हिंसाचाराची घटना घडू शकते, ही शक्यता गृहीत धरून ट्विटरने ट्रम्प यांचे खाते कायमचे बंद केले आहे.
एखाद्या व्यक्तीने ट्विटरने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्या खात्यावर कारवाई करण्यात येत. यामध्ये कायम खाते बंद करण्याचीही तरतूद आहे. त्यानुसार आता ट्रम्प यांच्या अकांऊटवर कारवाई करण्यात आली आहे. संसदेत हिंसाचार घडण्यापूर्वी ट्रम्प यांनी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर काही संदेश आणि व्हिडिओ पोस्ट केल्या होत्या. त्याही काढून टाकण्यात आल्या आहेत. फेसबूक आणि इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांच्या खात्यावर कारवाई केली आहे.
काय आहे ट्विटरचे नियमावली ?
सोशल मिडिया खाते वापरासाठी कम्युनिटी गाईटलाईन्स म्हणजेच नियमावली आखून दिलेली असते. ही नियमावली सर्वच सोशल मीडिया कंपन्यांनी वापरकर्त्यांना घालून दिलेली असते. ट्विटरचीही अशी नियमावली आहे. समाजात तेढ निर्माण करणारे ट्विट, एखाद्याची बदनामी करणारा मजकूर, भडकाऊ वक्तव्य, दंगल, हिंसाचार पसरण्यास कारणीभूत ठरेल असे वक्तव्य, आक्षेपार्ह व्हिडिओ, पुराव्याशिवाय केलेले वक्तव्य अशा काही मजकूरावर कारवाई केली जाते. इतरही अनेक अटी नियम सोशल मीडिया साईटकडून वापरर्कत्यांना घालून दिलेले असतात. त्यांचे पालन केले नाही तर तात्पुरती तसेच कायमची कारवाई कंपनीकडून करण्यात येते. काही वेळेला आक्षेपार्ह मजकूर साईटवरून काढून टाकला जातो.