वॉशिंगेटन डी. सी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा काल (बुधवार) शपथविधी झाला. अमेरिकेला पुन्हा एकसंध बांधणार असून मी सर्वांचा राष्ट्राध्यक्ष असेल, असे बायडेन यांनी शपथविधी कार्यक्रमानंतर मनोगत व्यक्त करताना म्हणाले. सत्तेत येताच त्यांनी पहिल्या दिवशी पॅरिस हवामान करारात पुन्हा सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बायडेन यांचे पूर्वसुरी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला या करारातून काढून घेतले होते. मात्र, बायडेन यांनी हा निर्णय बदलला आहे.
अन्यायकारक असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी नाकारला होता करार -
पर्यावरण संरक्षणासाठी पॅरिस हवामान करार २०१५ साली मंजुर करण्यात आला होता. मात्र, १७ साली या करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते. हा करार अमेरिकेचे नागरिक, व्यापारी, करदात्यांसाठी अन्यायकारक आहे. हा कराराचा पुन्हा एकदा आढवा घेतल्यानंतरच अमेरिका या करारात सहभाही होईल, असे म्हणत ट्रम्प करारातून बाहेर पडले होते. मात्र, आता बायडेन यांनी हा निर्णय बदलला आहे. अमेरिका करारात पुन्हा सहभागी होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अमेरिकेतील स्थानिक माध्यमांनी यासंबंधीचे वृत्त दिले आहे.