वॉशिंग्टन -अमेरिकेत एका दिवसातील सर्वाधिक कोरोना विषाणूबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) शनिवारी दिलेल्या ताज्या माहितीमध्ये म्हटले आहे की, देशात 4 लाख 3 हजार 359 नवीन रुग्णांची आणि 2 हजार 756 मृत्यूंची नोंद झाली आहे.
रविवारी पहाटेपर्यंत अमेरिकेमध्ये जगातील सर्वाधिक 1 कोटी 76 लाख 31 हजार 293 रुग्णांसह 3 लाख 16 हजार 6 मृत्यूंची नोंद झाली होती.
दुसरीकडे, शनिवारच्या आकडेवारीनुसार, गेल्या 7 दिवसांतील दर दिवशी सरासरी रुग्णांची संख्या 2 लाख 38 हजार 923 इतकी नोंदली गेली आहे. तर, या सात दिवसांत प्रत्येक दिवशी सरासरी मृत्यूंची संख्या 2 हजार 500 पर्यंत पोचली आहे. कोविड ट्रॅकिंग प्रकल्पातील नवीन आकडेवारीनुसार, 1 लाख 14 हजार 751 लोक सध्या रुग्णालयात दाखल आहेत.
हेही वाचा -सौदी अरेबियाने कोविड - 19 लसीकरण केले सुरू
या प्रकल्पातर्फे ट्विटरवर म्हटले आहे की, 'डिसेंबर महिन्यातील आतापर्यंत फक्त सतरा दिवस झाले आहेत आणि या महामारीने सर्वांत जास्त बळी घेतल्याचा हा दुसरा महिना ठरला आहे.' एकट्या डिसेंबरमध्ये देशभरात 42 हजार 500 हून अधिक मृत्यू कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झाले आहेत.
वॉशिंग्टनच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युएशन मॉडेलच्या माहितीनुसार, जानेवारीच्या मध्यापर्यंत देशात दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या 3 हजार 750 च्या पुढे जाऊ शकते. मॉडेलने 1 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 5 लाख 62 हजार मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
देशात मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे आणि या काळात नवे रुग्ण, मृत्यू, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
अमेरिकेच्या खाद्य आणि औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी अमेरिकन औषध उत्पादक मॉडर्नाच्या लसीला देशभरात आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली. फायझर-बायोटेकची लस यापूर्वी मंजूर झाली आहे.
ऑपरेशन वॉर स्पीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुस्ताव पर्ना यांनी शनिवारी सांगितले की, सोमवारपासून मॉडर्ना लसीची पॅकेजेस देशात वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यासाठी भरली जात आहेत.
हेही वाचा -जो बायडेन अन् जिल बायडेन यांना सोमवारी देणार फायझर लसीचा डोस