वॉशिंग्टन - उर्दू माध्यमांमध्ये काही मृतदेह बालाकोट येथून खैबर पख्तूनख्वा येथील आदीवासी भागांमध्ये हलवण्यात येत असल्याची माहिती देण्यात येत आहेत. भारताने दहशतवादविरोधी हवाई स्ट्राईक केल्यानंतर हे मृतदेह हलवण्यात येत असल्याचे अहवाल ही माध्यमे प्रसारित करत आहेत, अशी माहिती अमेरिकेचा सामाजिक कार्यकर्ता सेंग हस्नान सेरिंग याने गिलगिट येथून ट्विटद्वारे दिली आहे.
भारताने बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यात २०० हून अधिक दहशतवादी मारले गेले असल्याचे पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी कबूल करत आहेत. या दहशतवाद्यांना 'मुजाहिद' संबोधण्यात येत आहे. 'मुजाहिद' या शब्दाचा अर्थ अल्लाहकडून विशेष कृपा प्राप्त झालेला असा आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्तान सरकारला शत्रूंविरोधातील युद्धात मदत करताना हौतात्म्य प्राप्त झाले आहे, असा त्यांच्या कुटुंबीयांचा समज करून देण्यात आला आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याची शपथ घेण्यात येत आहे, असे हस्नान यांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हस्नान यांनी या व्हिडिओची सत्यता माहीत नसल्याचे किंवा तो अधिकृत आहे किंवा नाही हे माहीत नसल्याचे सांगितले आहे. मात्र, पाकिस्तान बालाकोट येथे घडलेल्या घटनेची काहीतरी लपवालपवी करत आहे, हे मात्र सत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'आंतरराष्ट्रीय तसेच, स्थानिक माध्यमांनाही या ठिकाणी प्रवेश नाही. हल्ला झालेल्या ठिकाणाची पाहणी करू देण्यात येत नाही. पाकिस्तान वारंवार स्ट्राईक झाला. मात्र, त्यात आमच्या जंगलाचे आणि शेतजमिनीचे नुकसान झाले असा दावा करत आहे. पण असे असले, तर त्यांना इतक्या काळापर्यंत या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्याचे काहीच कारण नव्हते. आंतरराष्ट्रीय माध्यमांना या ठिकाणी जाऊन स्वतःचे मत ठेवण्याचा अधिकार द्यायला हवा होता,' असे ते म्हणाले.
'त्याच वेळी जैश-ए-मोहम्मदने या ठिकाणी आपला मदरसा होता, असा दावा केला आहे. याशिवाय, उर्दू माध्यमेही या ठिकाणाहून काही दिवस मृतदेह खैबर पख्तूनख्वा येथे मृतदेह हलवण्यात आल्याचे सांगत आहेत. याचा अर्थ भारताने केलेला हवाई सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झाल्याचा पुरेसा पुरावा आहे, असा होतो. पाकिस्तान काहीच पुरावे सादर करु शकलेला नाही,’ असे हस्नान यांनी म्हटले आहे.
भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनीही २६ फेब्रुवारीला या ठिकाणी हवाई हल्ला झाल्याचे आणि मोठ्या प्रमाणात दहशतवादी ठार झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. पाकिस्तान मात्र, जैशच्या तळावरील दहशतवादी ठार झाल्याचे भारताचे सर्व दावे फेटाळत आहे.