वॉशिंग्टन डी. सी - कोरोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. २० जानेवारीला बायडेन यांचा शपथविधी होणार असून कारभार हाती घेण्याआधीच त्यांनी पॅकेजची घोषणा केली आहे. १. ९ ट्रिलियन डॉलर म्हणजेच १ लाख ९० हजार कोटी डॉलरचे हे पॅकेज असून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी विविध क्षेत्रांना मदत केली जाणार आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यास बायडेन यांनी प्राधान्य दिले आहे.
तणावपूर्व वातावरणात सुखद धक्का -
मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना महामारी नीट हाताळली नसल्याचा आरोप जो बायडेन आणि डेमोक्रॅटिक पक्षाने सतत केला होता. ट्रम्प यांनी सुरुवातीच्या काळात कोरोना महामारीची खिल्लीही उडवली होती. याचा त्यांना निवडणुकीत मोठा फटका बसला. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होण्यास कोरोना हे एक मोठे कारण आहे. मागील आठवड्यापासून अमेरिकेवरील संसदेच्या हल्ल्याची देशात चर्चा सुरू होती. अशा तणावपूर्ण वातावरणात बायडेन यांनी पॅकेज जाहीर करून नागरिकांना सुखद धक्का दिला आहे.
कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी 'अमेरिका रेस्क्यू प्लॅन'
जो बायडेन यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी दिर्घकालीन धोरण आखले आहे. या अंतर्गत कोरोना लसीकरण, राज्य सरकारे, स्थानिक प्रशासन, उद्योग, व्यवसाय आणि जनतेला मदत करण्यात येणार आहे. जगभरात कोरोनाचा सर्वाधिक प्रसार अमेरिकेत झाला. सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेत झाले असून लाखो लोकांचे रोजगार गेले. मागील एक वर्षापासून अमेरिकेची अर्थव्यवस्था गंटागळ्या खात असून तिला सावरण्यासाठी बायडेन यांनी या पॅकेजद्वारे सरकारच्या धोरणांची दिशा स्पष्ट केली आहे.
उद्योग, व्यवसाय बेरोजगारी, लसीकरणावर पैसा खर्च होणार -
देशाचा कारभार हाती घेतल्यानंतर १०० दिवसांमध्ये १० कोटी लोकांना लस देण्याचे ध्येय बायडेन यांनी ठेवले आहे. तसेच वसंत ऋतूपर्यंत बहुसंख्येने शाळा महाविद्यालये सुरू करण्याचे उद्दिष्टही बायडेन यांनी ठेवले आहे. ढासळलेली आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी या पॅकेजमधून मोठी मदत करण्यात येणार आहे. तसेच बेरोजगार भत्ताही देण्यात येणार आहे. कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यापासून आमच्या कामाची सुरूवात होणार असल्याचे बायडेन यांनी विजयानंतर दिलेल्या भाषणात म्हटले होते. जोपर्यंत महामारी नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्थाही सुधारणार नाही, असे ते म्हणाले होते.