परभणी- बारावी परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजी विषयाच्या पेपरला ५ कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. गुरुवारी जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रावरून २४ हजार ३६८ विद्यार्थ्यांपैकी २३ हजार ४६८ (९६.७०) जणांनी परीक्षा दिली असून ८०० विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. दरम्यान, शहरी भागातील ४ परीक्षा केंद्र ऐनवेळी ग्रामीण भागात स्थलांतर केल्याने गोंधळ उडाला होता.
परभणी जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांनी कॉपी मुक्तीसाठी महसूलचे पथक स्थापन करून कॉपी करणाऱ्यांवर मोठा अंकुश लावला होता. त्यानंतर मात्र, कॉपीमुक्तीचा हा प्रयोग हळूहळू कमी होत गेला. गतवर्षी वादग्रस्त ठरलेल्या परीक्षा केद्रांना यावर्षी नव्याने मान्यता देण्यात आल्याने या परीक्षेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐनवेळी ४ परीक्षा केंद्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बदल केला. शहरी भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवर परीक्षेसाठी पाठविण्यात आले. यात पेडगाव परीक्षा केंद्रावर तब्बल १२०० विद्यार्थी तर टाकळी कु., इसाद, महातपुरी, धानोरा आदी परीक्षा केंद्रावर ६०० विद्यार्थी बसविण्यात आले आहेत. या मागे मात्र कुठलेही ठोस कारण देण्यात आले नाही. ऐनवेळी संबंधित महाविद्यालयांना शिक्षण विभागाने पत्र पाठवून गोंधळ निर्माण केला. शहरी भागातील कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षार्थींना सामावून घेण्याची क्षमता असताना देखील ऐनवेळी परीक्षा मंडळाने गतवर्षी वादग्रस्त ठरलेल्या परीक्षाकेंद्रांवर परीक्षार्थी पाठविण्यामागे काय हेतू आहे, याची चर्चा शिक्षण क्षेत्रात होत आहे.
दरम्यान, बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागासह महसूल प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. परीक्षा केंद्रांची निर्मिती, पर्यवेक्षकांची नियुक्ती तसेच बैठे आणि भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी १ हजार ४५६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे.