बॉलिवूडचे दिवंगत ज्येष्ठ अभिनेता सुनिल दत्त यांचा आज जन्मदिन आहे. ६ जून १९२९ रोजी जन्मलेल्या सुनिल दत्त यांनी आपल्या आयुष्यात अनेक खडतर चढ उतारांचा सामना केला आणि एक विश्व निर्माण केले. १८ वर्षापूर्वी त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला असला तरी आजही भारतीय सिनेसृष्टी त्यांची आठवण विसरलेली नाही. आपल्या कष्टाने आणि कोणत्याही कार्यात झोकून देण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी सर्व कार्यात यश संपादन केले. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्य त्यांच्या जीवन कार्याचा मागोवा घेऊयात.
सुनिल दत्त यांची कंडक्टर म्हणून पहिली नोकरी - सुनिल दत्त यांचा जन्म तत्कालिन पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्याती एक खेड्यात झाला. लहानपणीचं त्यांचे वडील वारल्याने त्यांच्या संगोपनाची सर्व जबाबदारी आईवर आली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पंजाबमध्ये घेतल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी मुंबईची वाट धरली. जय हिंद कॉलेजमध्ये अॅडमिशन तर मिळाले परंतु आर्थिक अडचणीमुळे नोकरी शोधण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. अशावेळी नोकरीचा शोध चालू असताना त्यांना मुंबईत बस कंडक्टरची नोकरी मिळाली.
सिलोन रेडिओत अनाउन्सर म्हणून नोकरी - नोकरी आणि शिक्षण सुरू असताना कष्टाशिवाय पर्याय नाही हे त्यांना कळून चुकले होते. या शहरात यशस्वी होऊन दाखवायचे ही जिद्द त्यांनी मनाशी ठाम बाळगली होती. यासाठी वाट्टेल ते कष्ट घेण्याची तयारीही त्यांनी केली. काळाच्या ओघात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्यांना सिलोन रेडिओवर उद्घोषक म्हणून नोकरी मिळाली. आपल्या भारदस्त आवाजाने त्यांनी लोकांना मंत्रमुग्ध करायला सुरुवात तर केली पण त्याचवेळी अभिनयात हात आजमवयाची स्वप्नेही मनात होती. दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाले होते आणि फिल्म इंडस्ट्रीत एक नवचैतन्य निर्माण झाले होते.
मदर इंडियाने आयुष्याला मिळाली कलाटणी - सुनिल दत्त यांनी निर्मात्यांची दारे ठोठावायला सुरूवात केली, रेल्वे प्लॅटफॉर्म नावाच्या एका चित्रपटात छोटी भूमिका त्यांना मिळाली. पण हवी तशी प्रसिद्धी किंवा लौकिकही मिळाला नाही. त्यानंतर मात्र त्यांच्या नशीबाला कलाटणी मिळाली. त्याकाळातील आघाडीच्या नायिका नर्गिस यांच्यासोबत त्यांना मदर इंडिया या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचे त्यांनी सोने केले. या चित्रपटाला देशा विदेशात प्रचंड लोकप्रियता मिळाली. मदर इंडिया हा ऑस्करसाठी नामांकन मिळालेला पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. त्यानंतर सुनिल दत्त यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही आणि एक यशस्वी अभिनेता म्हणन प्रचंड लोकप्रियता त्यांच्या वाट्याला आला.
सुनिल दत्त आणि नर्गिस यांची प्रेमकहानी- मदर इंडियाच्या सेटवरच सुनिल दत्त आणि नर्गिस यांची प्रेमकहानी सुरू झाली. या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सेटवर आग लागली. या आगीत नर्गिस अडकल्या होत्या. कोणीही पुढे जाऊन त्यांना वाचवण्याचे धाडस करु शकत नव्हते कारण यात होरपळले जाण्याची भीती होती. सुनिल दत्त यांनी मात्र आपल्या प्राणाची जराही फिकीर न करता आगामी उडी घेतली आणि नर्गिस यांना सुखरुप बाहेर काढले. यात आगीमध्ये दत्त यांना खूप भाजले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. खरंतर याच प्रसंगानंतर नर्गिस यांच्या मनात सुनिल दत्त यांच्या विषयी ह्रदयात प्रेम निर्माण झाले. त्यानंतर दोघे प्रेमात पडले आणि सुखी संसार सुरू झाला. त्यांच्या संसार वेलीवर प्रिया, नम्रता आणि संजय फुले उमलली.