मुंबई - Vijay Varma bags Best Actor India award : अभिनेता विजय वर्मा आपल्या अभिनयाच्या जादूनं नेहमीच प्रेक्षकांवर मोहिनी घालत आलाय. सहज, नैसर्गिक अभिनयानं तो प्रत्येक व्यक्तिरेखेत प्राण फुंकतो. या अष्टपैलू अभिनेत्याची 'दहाड' ही वेब मालिका गाजली. यातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला प्रतिष्ठित 'एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स'मध्ये भारताचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला आहे. 'दहाड' ही वेब सिरीज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित झाली होती, यात विजय वर्मानं एका सिरीयल किलरची भूमिका केली होती.
वर्षानुवर्षे, विजय वर्मानं सशक्त भूमिका साकारत स्वतःसाठी एक स्थान निर्माण केलंय. विशेषत: 'डार्लिंग्स' आणि 'दहाड' सारख्या कलाकृतीमध्ये त्यानं ग्रे शेड असलेल्या पात्रांच्या भूमिका वठवल्या. त्याचाच एक भाग म्हणून 'दहाड' मधील सिरियल किलरच्या भूमिकेमुळे त्याला 'एशियन अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स'मध्ये भारताचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला.
विजय वर्माला मिळालेला हा पुरस्कार 'दहाड' टीमसाठी खूप महत्त्वाचा आहे. 'दहाड'ची वेब सिरीजची निर्मिती केलेल्या एक्सेल मूव्हीजने त्याचं हे यश सोशल मीडियावर साजरं केलं आणि त्याच्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला. या सन्मानाबद्दल तितकाच रोमांचित झालेल्या विजय वर्मानंही त्याच्या इंस्टाग्रामवर ही पोस्ट मनापासून शेअर केली. विजयनं एशियन अकादमी आणि 'दहाड'च्या निर्मात्यांचे आभार व्यक्त केले. 'एवढा मोठा सन्मान! धन्यवाद एशियन अकॅडमी', असं त्यानं इन्स्टाग्रामवर लिहिलंय.
विजयनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताच त्याचे चाहते, फॉलोअर्स आणि सहकारी कलाकार त्याचं अभिनंदन करण्यासाठी एकत्र आले. त्यांनी विजयवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसतंय. त्याच्यातील प्रतिभेमुळे तो आगामी काळात खूप महान होणार याची खात्री अनेक युजर्सनी व्यक्त केलीय.