महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 2, 2023, 5:27 PM IST

ETV Bharat / entertainment

Pradyot Pendharkar : निर्माते प्रद्योत पेंढारकर म्हणाले आम्हाला 'राजवारसा' तर्फे 'कलावारसा' अधिक देदीप्यमान करायचा आहे!

'राजवारसा' निर्मिती संस्थेतर्फे तयार करण्यात आलेला 'सुभेदार' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या ते एका सस्पेन्स थ्रिलर आणि विनोदी चित्रपटावर काम करीत असून एक हिंदी शॉर्ट फिल्म देखील बनवत आहेत.

Pradyot Pendharkar
प्रद्योत पेंढारकर

मुबंई: गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘शेर शिवराज’ याची निर्मिती 'राजवारसा' निर्मितीसंस्थेने केली होती. निर्माते प्रद्योत पेंढारकर यांची ही निर्मितीसाठी असून त्या बॅनर खाली त्यांनी ‘सापळा’ आणि ‘केस ९९’ हे चित्रपट निर्माण केलेले आहेत. तसेच त्यांच्या 'राजवारसा' निर्मिती संस्थेतर्फे तयार करण्यात आलेला 'सुभेदार' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या ते एका सस्पेन्स थ्रिलर आणि विनोदी चित्रपटावर काम करीत असून एक हिंदी शॉर्ट फिल्म देखील बनवत आहेत. यातील 'सापळा'मध्ये चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, नेहा जोशी अशी भक्कम स्टारकास्ट आहे आणि 'केस ९९' मध्ये अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, चिन्मय मांडलेकर अशी तगडी कलाकारांची फळी आहे.

निर्मिती क्षेत्रात पाऊल :छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून मिळालेला वारसा म्हणजेच तो 'राज वारसा’ असे मानत त्यांनी आपल्या निर्मिती संस्थेचे ते नाव ठेवले. तसेच तो वारसा आजच्या पिढीला कसा मार्गदशक ठरेल यावर संबंधितांशी विचार विनिमय करीत निर्माते प्रद्योत पेंढारकर यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. निर्मिती पदार्पणात त्यांनी 'शेर शिवराज' या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांच्या मते मिळालेला हा वारसा योग्यरीतीने जपत पुढच्या पिढीच्या हाती सोपवायला हवा. ते म्हणतात की, चित्रपट निर्मितीत सुरू झालेला हा प्रवास केवळ योगायोग नसून एखाद्या गोष्टीचा योग जुळून येण्यासाठी त्यामागची भावनाही तितकीच तळमळीची असणे आवश्यक असते. त्यामुळे या वारसाकडे केवळ ‘व्यवसाय’ म्हणून न पहाता ‘अधिष्ठान’ म्हणून मी पाहतो. मला भविष्यात अनेक दर्जेदार आशयघन सिनेमांची निर्मिती करायची आहे. वर्षाला चार उत्तम चित्रपट मला माझ्या 'राजवारसा' या निर्मितीसंस्थेतर्फे करावयाचे आहेत.


युद्धकलेचे धडे शिकवण्याची संधी : प्रद्योत पेंढारकर पुढे म्हणाले की, या क्षेत्रात येईन असे कधीच वाटले नव्हते. परंतु माझे भागीदार अनिल वरखडे यांना चित्रपट क्षेत्राचे नेहमीच आकर्षण होते. त्यांच्या या क्षेत्रात अनेक ओळखीही होत्या. याआधी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’ या संस्थेतफे गेले दशकभर शिवकालीन युद्धकलेचे धडे देणारी प्रशिक्षण संस्था चालवत आहोत. त्यामुळेच ‘हर हर महादेव’, आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटासाठी युद्धकलेचे धडे शिकवण्याची संधी आमच्या संस्थेला मिळाली. लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपट निर्मितीचा प्रस्ताव मांडला आणि आम्ही छत्रपतींचा वारसा पुढे नेता येऊ शकतो हा विश्वास दिला आणि त्यातून ‘राजवारसा’ उदयास आली आणि आम्ही 'शेर शिवराज’ ची निर्मिती केली. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात झालेल्या एका लढाईत अनिल वरखडे यांचे पूर्वज कोंडाजी वरखडे यांचा सहभाग होता. आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली म्हणून आणि त्यांचे कर्तृत्व व इतिहास ‘शेर शिवराज’ चित्रपटातून मांडण्याची संधी मिळत असल्याने आम्ही ही निर्मिती केली.



कलावारसा अधिक देदीप्यमान : त्यांनी पुढे सांगितले की, आधीच्या अनेक व्यवसायांचा अनुभव गाठीशी होता. आम्हाला शिवकालीन युद्धकलेवरती चित्रपट करायचा होता. दिग्पाल लांजेकर यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे आम्हाला हिम्मत मिळाली आणि 'शेर शिवराज’ चित्रपटाची निर्मिती केली. आता वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून हा प्रवास आम्हाला यशस्वीपणे पुढे घेऊन जायचा आहे. आम्ही कथानकाला जास्त महत्त्व देतो, दिग्दर्शक नवीन असला तरी चालतो. त्याचा दृष्टीकोन आणि विषयाचे आकलन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही केवळ ऐतिहासिक चित्रपटांमध्ये अडकून राहणार नसून चांगल्या आशयाचा, मनोरंजनात्मक कलाकृतींच्या निर्मितीसाठी सदैव तत्पर असू. आमच्यासाठी 'राजवारसा' तर्फे 'कलावारसा' अधिक देदीप्यमान होणे महत्वाचे आहे.

हेही वाचा :Preity Zinta and Gene Goodenough : प्रिती झिंटाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केल्या जुन्या आठवणी; फॅन म्हणाला- तुमचे प्रेम मजबूत आहे

ABOUT THE AUTHOR

...view details