मुंबई - ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत असल्याने त्या जॉनरचे अनेक चित्रपट येऊ घातले आहेत. मराठी चित्रपटांत शिवकालीन चित्रपटांची मागणी वाढत असून छत्रपती शिवाजी महारांजांच्या अवतीभवती घडणारी कथानकं मराठी चित्रपटांतून दिसू लागली आहेत. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांनी अनेक पराक्रम केलेत आणि ती इतिहासातील पानं पडद्यावर जिवंत दिसावीत यासाठी अनेक चित्रपट बनू लागले आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘रावरंभा‘. हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी मराठा मावळ्यांनी मोठे योगदान दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या या मावळ्यांबद्दल आदर आणि अभिमान होता. त्यांच्यासाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी स्वतःची आहुती देणारे, आनंदाने मृत्यूला मिठी मारणारे असे अनेक मावळे इतिहासात प्रसिद्ध आहेत. या योद्ध्यांच्या खाजगी जीवनाबद्दल लोकांना फारच कमी माहिती आहे. या पराक्रमी योद्ध्यांच्या पाठीमागे सावलीसारखी ठामपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या सहचारिणी आणि त्यांचे निर्व्याज प्रेम व त्याग याबद्दलच्या गोष्टी लोकांसमोर आलेल्या नाहीत. आता तशीच एक गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येतेय, रावरंभा या चित्रपटातून. अनुप जगदाळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
रावरंभा मधून इतिहासातील एक पानं उलगडणार- पराक्रमी मावळे आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या त्यांच्या सखीची गोष्ट तशी समोर येत नाही किंबहुना अजूनपर्यंत आलेली नाही. तसेच त्यांच्या घरातील आया बहिणींनी स्वतःचे कुंकू धोक्यात घातले तेव्हा कुठे हे हिंदवी स्वराज्य आकार घेऊ शकले. रावरंभा मधून इतिहासातील एक पानं उलगडणार आहे. रांगडा गडी राव, ज्याने स्वराज्यासाठी तलवारीशी लग्न करून आपले सर्वस्व अर्पण करण्याची शपथ घेतली आहे. ‘आधी स्वराज्य मग आपला संसार’ हे त्याचे ब्रीद आहे. आणि सुंदर आणि निडर रंभा, जी नेहमी राव च्या पाठीशी आयुष्यभर उभी राहिली एका ढालीसारखी. यांची रांगडी प्रेमकहाणी आणि त्यांच्या प्रेमकथेचे मोरपंखी पान उलगडणार आहे रावरंभा सिनेमातून. नुकताच या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा मुंबईत पार पडला आणि त्यावेळी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे या सोहळ्यात शिवकाळ निर्माण केला गेला होता आणि चित्रपटातील कलाकारांनी टाळ्यांच्या गजरात ऐतिहासिक वेशात रंगमंचावर एन्ट्री घेतली.