कोल्हापूर- चित्रतपस्वी भालजी पेंढारकर (बाबा) यांनी पोटच्या मुलाबाळाप्रमाणे जपलेला, मराठी चित्रपट सृष्टीचा चालता बोलता इतिहास असलेला जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे, अशी भूमिका कोल्हापूरच्या चित्रकर्मींनी घेतली आहे. जयप्रभा स्टुडिओ भोवती सुरू असलेले राजकारण, होणारे आरोप प्रत्यारोपामुळे व्यथित झालेल्या कोल्हापुरातील सिनेकलाकार व निर्मात्यांनी स्टुडिओबाबत होणारं राजकारण थांबवावं आणि राज्य सरकारने हस्तक्षेप करुन इथे पुन्हा चित्रीकरण सुरू करावे अशी मागणी केली आहे.
चित्रपट निर्मितीची मोठी पंरपरा असलेला स्टुडिओ - अखेरची घटका मोजत असलेला कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टीची आन-बान शान होता. मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या कलेचा श्री गणेशा कोल्हापुरातील याच जयप्रभा स्टुडिओमधून केला. यामध्ये पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांचा समावेश आहे. मराठी घराघरात पोहोचलेल्या दादा कोंडके यांनी आपले 9 रौप्यमहोत्सवी चित्रपट याच जयप्रभा स्टुडिओमध्ये चित्रित केले, मात्र आता जयप्रभाला घरघर लागली आहे.
लता मंगेशकरांनी केली स्टुडिओची विक्री - कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी मराठी चित्रपट सृष्टीला हातभार लागावा हा उद्देश ठेवून हा स्टुडिओ 1 ऑक्टोबर 1933 रोजी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांना चालवण्यास दिला होता. पुढे 14 मे 1946 दिवशी भालजी पेंढारकर यांनी हा स्टुडिओ कोल्हापूर दरबारकडून 2 लाख 10 हजार रुपयात खरेदी करून आपल्या दोन्ही मुलांची नावे जय आणि प्रभा या स्टुडिओला दिले, मात्र कालांतराने स्टुडिओतील खर्च आणि होणारा व्यवसाय परवडत नसल्याने भालजींनी स्टुडिओ लता मंगेशकर यांना विकला. काही काळाने मंगेशकर यांनीही हा स्टुडिओ विकायला काढल्यामुळे कोल्हापूरकरांचा संताप मंगेशकर यांना सहन करावा लागला होता. यातील काही भाग संवर्धित करण्यात आला असून काही भाग विकण्यात आला आहे.
जयप्रभा स्टुडिओ आणि राजकारण- हेरिटेज वास्तू म्हणून असलेली जयप्रभा स्टुडिओची इमारत दोन वर्षांपूर्वी विकण्यात आली असल्याचे समोर आले असून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मुलांच्या खासगी कंपनीने हा व्यवहार केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी या व्यवहारातील खरेदीपत्रक नावे असलेला सचिन राऊत हा पानपट्टीधारक आहे, त्याच्याकडे साडेसहा कोटी रुपये कुठून आले याची चौकशी व्हावी तसेच क्षीरसागर कुटुंबीय यांच्यासह राऊत याचीही नार्कोटेस्ट घेण्याची मागणी केली आहे.