मुंबई: जय जय स्वामी समर्थ ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात पहिली जाते. लहान पडद्यावर भक्तीरसातील मालिकांना उदंड पाठिंबा मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता प्रामुख्याने पापभीरू आहे. देवदेवतांसोबत अवतरांवर देखील विश्वास ठेवणारी आहे. त्यामुळेच 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेला भरघोस पाठिंबा मिळतो आहे, अगदी परदेशातून सुद्धा. यातील प्रमुख भूमिका करणारे अक्षय मुडावदकर यांनी ही मालिका आणि त्यांच्या भूमिकेबद्दल गप्पा मारताना बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला.
अक्षय मुडावदकर यांचा अनुभव: 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेने नुकतेच ७५० भाग भाग पूर्ण केले. अक्षय मुडावदकर म्हणाले की, हा ७५० भागांचा प्रवास माझ्यासाठी खूप काही शिकविणारा आहे. तब्बल अडीच वर्ष ही भूमिका मी साकारतोय आणि माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल अनुभवत आहे. मला सर्व थरातून प्रशंसा मिळाली आहे. मोठे मला आपल्यातील एक समजतात आणि लहानगे स्वामी आजोबा म्हणून हाक मारतात, हे माझ्यासाठी खूप स्वप्नवत आहे. ही स्वामींचीच इच्छा आहे, असे मला मनापासून वाटते. मी जेथे जेथे जातो, म्हणजे विमानतळ असो, रेल्वे स्थानक असो, एसटी स्टँड असो किंवा अगदी हॉस्पिटल असो, तिथे तिथे सर्व वयोगटातील व्यक्ती येऊन मला भेटतात. त्यांच्या वागण्यातून प्रेम ओथंबळत असते. मला कल्पना आहे की, हे प्रेम स्वामींसाठी आहे परंतु मी तिथे असल्यामुळे मला हे सर्व अनुभवता येतेय यांचा आनंद वाटतो.