मुंबई - मराठी सिनेमांच्या आशयाबरोबरच चित्रपटांची नावेही वास्तववादी असतात. 'चौक' हे त्यातीलच एक नाव. प्रत्येकाच्या आयुष्यात चौकाचे वेगवेगळे महत्त्व असते. इथे अनेक गोष्टी घडत असतात, काही महत्त्वाच्या तर काही बिनबुडाच्या. परंतु प्रत्येक जण अधनं मधनं चौकातल्या आठवणींमध्ये रमताना दिसतो. चौकातल्या मंडळींचा गलका, मित्र मैत्रिणींचे गप्पांचे फड आणि वादविवाद, सततची घाई गडबडीतील येणाऱ्याजाणाऱ्यांची वर्दळ, चौकातल्या सभा तसेच एकमेकांची उडवलेली टर आदी गोष्टी घडायच्या थांबत नाहीत. आता याच चौकातील विषयावरील गोष्ट घेऊन येताहेत दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड. नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक पोस्टरच्या माध्यमातून सिनेरसिकांसमोर प्रकाशित करण्यात आली.
दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड उर्फ दया म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो 'मुळशी पॅटर्न'. त्यांची भूमिका जरी छोटी असली तरी लक्षात राहणारी होती. यापूर्वी त्यांनी हिंदी मधील तान्हाजी. देऊळ बंद, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची झलक परिणामकारकरित्या दर्शविली होती. ते मुळशी पॅटर्न चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या परममित्रांपैकी एक. अर्थातच दया सुद्धा क्रियेटीव्ह फिल्ड मध्ये पूर्वीपासून कार्यरत आहे. आता ते एका चौकाची गोष्ट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चौक’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये, चौकात फळा दिसतोय ज्यावर सूचना, सुविचार लिहू शकता. तसेच तो फळा दोस्ती ग्रुप, पुणे यांचा असल्याचे समजते आणि या फळ्यावर मोठ्या अक्षरात ‘चौक’ असं लिहिलेले दिसत असून निर्माते आणि दिग्दर्शक यांचीही नावे ठळकपणे लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रपटात महाराष्ट्रातील चौकाचौकात घडणारी गोष्ट असणार हे देखील समजून येते.