रत्नागिरी - गुहागर येथील प्रचार सभेमध्ये पर्यावरणमंत्री, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधला. सुनील तटकरे सिंचन खात्याचे मंत्री होते, तरीही कोकणात सिंचन का झाले नाही, असा त्यांनी सवाल केला. कोकणातली पाटबंधाऱ्याची कामे बंद आहेत. ती कामे बंद का आहेत, याचे सुनील तटकरे यांनी उत्तर द्यावे असे आव्हान कदमांनी यावेळी दिले.
सुनील तटकरे जलसंपदा मंत्री होते, तरीही कोकणात सिंचन का झाले नाही - रामदास कदमांचे टीकास्त्र
यावेळी अनंत गीते साहेबांना 2 लाखाचे लीड देऊ, असा विश्वास रामदास कदमांनी व्यक्त केला. तसेच गेल्यावेळी जर गीते साहेब पराभूत झाले असते, तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो, अशी सलही त्यांनी बोलून दाखविली.
अनंत गीतेंबरोबर असलेल्या जुन्या वादावर रामदास कदम यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, की अनंत गीते व माझ्यामध्ये वाद होते. गेल्या वेळच्या निवडणुकीत नाराज होतो, अशी जाहीर कबुलीही त्यांनी दिली. मात्र यावेळी अनंत गीते साहेबांना २ लाखांची लीड देऊ, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. तसेच गेल्यावेळी जर गीते पराभूत झाले असते, तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो, अशी सलही त्यांनी बोलून दाखविली.
भास्कर जाधवांनी तटकरेंच्या व्यासपीठावर जावू नये- रामदास कदम
दरम्यान भास्कर जाधव यांच्याबाबत कदम म्हणाले की ते माझे चांगले मित्र आहेत. पण माझ्या या मित्राची वाट तटकरेंनी लावली. आता पुन्हा हे जाधव तटकरेसोबतच आहेत. भास्कर जाधव तुम्हाला हे शोभादायक नाही. भास्कर जाधव तुम्ही स्वाभिमानी आहात. त्यामुळे यापुढे तुम्ही तटकरे यांच्या व्यासपीठावर जाऊ नका, असे आवाहन रामदास कदम यांनी जाधव यांना केले. नरेंद्र मोदी यांच्यासारखा कणखर माणूस पाकचा बंदोबस्त करण्यासाठी असायला हवा, असे त्यांनी मत व्यक्त केले.