मुंबई - एका रात्रीत नोटबंदी करूनही काळा पैसा बाहेर आलेला नाही. यामुळे जर याची चौकशी केली तर, नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार ठरेल, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या काळाचौकी येथील शहीद भगतसिंग उद्यानात राज ठाकरे यांची आज सातवी सभा झाली. यावेळी राज ठाकरे बोलत होते.
राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपला कानपिचक्या घेतल्या. ते म्हणाले , की मुख्यमंत्र्यांना झोप यावी म्हणून भाषणाला दोन दिवस गॅप घेतला. माझ्या भाषणांनी भाजपवाले भांबावले आहेत. काय उत्तरे द्यायचे ते त्यांना कळतच नाही. मोदींवर टीका करताना ते म्हणाले, की पंतप्रधानांनी एका रात्रीत नोटबंदी केली. हजारो रोजगार बुडाले. अनेक जण नोकऱ्या गेल्याने बेरोजगार झाले. नोटाबंदीची ज्यावेळी चौकशी होईल, त्यावेळी देशातील सर्वात मोठा घोटाळा ठरेल असे ठाकरे म्हणाले.
माझ्या स्क्रिप्ट बारामतीतून येतात शरद पवार मला चालवतात, असे मुख्यमंत्री म्हणतात. मग मी आता उभा राहिलो आहे का, असे सांगत मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली. खरंतर दिल्लीत शरद पवार यांचे दरवाजे ठोठावण्यात भाजपचे नेते आघाडीवर असतात. खूद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पवारांचे बोट धरुन राजकारण शिकल्याचे मान्य करतात, असा टोलाही त्यांनी लगावला.