ठाणे - व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या दोन तस्करांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकारी ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांकडून तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलची आणि एक मोटारबाईक जप्त करण्यात आली आहे.
जप्त केलेल्या 'उलटी'ची किंमत तब्बल 4 कोटी
एकीकडे कोरोनाने लोक त्रस्त आहेत. त्यात अनेकांच्या नोकरी-धंदे ठप्प झालेत, यामुळे अनेकांवर आर्थिक संकट आले असून यामुळेच अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळू लागलेत. असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. ठाण्यातील एका गुन्ह्यात आंतराष्ट्रीय मार्केटमध्ये कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या, व्हेल माशाची उलटी विक्री करण्यास दोन जण ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटच्या पथकास मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी जुना जकात नाका, घोडबंदर रोड येथे सापळा लावला. यावेळी दोन संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून जात असताना पोलिसांना आढळून आले. दोघा मोटारसायकलस्वार व्यक्तींना पोलिसांनी अडवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 4 किलो 100 ग्रॅम इतकी समुद्रात आढळणाऱ्या व्हेल माशाची उलटी आढळून आली. मंगेश जावळे व नंदकुमार दाभोळकर असे या आरोपींची नावे असून पोलिसांनी या दोघा तस्करांना अटक करीत व्हेल माशाची उलटी व मोटारसायकल जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या उलटीची किंमत तब्बल 4 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.