ठाणे- जिल्ह्यात ग्रामीण परिसरात पाण्याची भटकंती करताना ग्रामस्थ महिला दिसत होत्या. परंतु, आता शहरी भागातही पाणीटंचाई झळ जाणू लागल्याने विविध शहरातील सोसायटी आणि इमारतीमधील रहिवाशी टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे. टँकरचालकही याचा फायदा घेताना उल्हास नदीतून दिवसरात्र पाणी चोरुन त्याची मोठ्या किंमतीने विक्री करत असल्याचे समोर आले आहे.
उल्हास नदीतून होतेय पाणी चोरी, पाणी टंचाईमुळे अंबरनाथ- बदलापूरमध्ये टँकर लॉबी मालामाल
टँकरचालक उल्हास नदीच्या पात्रातून दरदिवशी १०० पेक्षा अधिक टँकर पाणी चोरुन सोसायट्यांमध्ये १ ते २ हजार रुपयांना विक्री करत आहेत.
बदलापूर-अंबरनाथ शहरात पाणीटंचाईमुळे टँकर लॉबी सक्रीय झाली आहे. पिण्याच्या पाण्यासोबत आता इमारतीच्या बांधकामासाठीही पाणीपुरवठा थेट उल्हास नदीतून उचलण्यात येत आहे. उल्हास नदीवरील पाण्याचे आरक्षण हे प्रत्येक शहरासाठी निश्चित केले आहे. पंरतु, असे असतानाही मोठ्या प्रमाणात नदीतून पाण्याची चोरी होताना दिसत आहे. टँकरचालक उल्हास नदीच्या पात्रातून दरदिवशी १०० पेक्षा अधिक टँकर पाणी चोरुन सोसायट्यांमध्ये १ ते २ हजार रुपयांना विक्री करत आहेत.
विशेष म्हणजे टँकर लॉबीला पाणी उचलण्याची परवानगीही घ्यावी लागत नाही. अथवा चोरणाऱ्यांना कुणाकडे पैसेही भरावे लागत नाहीत. पाण्याची चोरी ही पोलिसांसमोर होत असतानाही कोणतीही कारवाई केली जात नाही. यामुळे टँकर लॉबी मालामाल होत आहे.