ठाणे - रस्त्यावरून पळणाऱ्या दुचाकी गाड्यांचे धडधडणारे सायलेन्सर आणि कर्णकर्कश प्रेशर हॉर्न्सने ज्येष्ठ नागरिक आणि तान्ह्या बाळांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे अनेक व्याधी जडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी एक धडक मोहीम हाती घेतली आहे. १५ जून २०२१पासून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत जवळपास एक हजारपेक्षा जास्त सायलेन्सर आणि जवळपास ४०० प्रेशर हॉर्न्स बुलडोजर खाली चिरडण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
दुकानदारांवरही दाखल होणार गुन्हे
कानाचे पडदे फाटतील एवढे कर्णकर्कश प्रेशर हॉर्न्स आणि छातीत धडकी भरवणारे सायलेन्सर विशेषतः बुलेट या गाडीत लावले जातात. त्याच्या आवाजाने अनेक ज्येष्ठ नागरिक आणि लहान बाळांना निद्रानाश, चिडचिड होणे आणि हायपरटेन्शन यासारख्या गंभीर व्याधी जडत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने त्याची सत्यता पडताळून या कारवाईला सुरुवात केल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले. सर्व दुचाकीचालकांनी असे हॉर्न आणि मॉडिफाइड सायलेन्सर लावले असल्यास ते त्वरित काढावे, अन्यथा वाहनचालकासोबतच हे सायलेन्सर आणि हॉर्न्स विकणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल, असा इशारादेखील पाटील यांनी दिला.
साडे तीन लाखांचा दंड
या कारवाईत नुसते प्रेशर हॉर्न आणि सायलेन्सर जप्त केले नाहीत, तर प्रत्येकी एक हजार याप्रमाणे दंडदेखील आकारण्यात आला आहे. त्यामुळे साडेतीन लाखांचा दंड शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. ही कारवाई अशीच सुरू राहिल्यास आवाज करणारे सायलेन्सर नक्कीच गायब होतील, असा विश्वास पोलिसांना आहे.