ठाणे- टाळेबंदी वाढल्याने शेकडो परप्रांतीय मजुरांची अवस्था 'आगीतून फुफाट्यात' अशीच झाली आहे. मजुरांनी उत्तरप्रदेश गाठण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरून पायी प्रवास सुरू केला. मात्र हे मजूर शहापूर तालुक्यात दाखल होताच काही ग्रामस्थांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांची टाळेबंदी वाढवून ३ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यातच संचारबंदी व टाळेबंदीच्या काळातच शेकडो परप्रांतीय मजूर घर गाठण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरून पायी चालत आहेत.
विशेष म्हणजे जिल्हाबंदी तसेच काही दिवसांपूर्वीच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तालुक्यातही सीमा बंदी केल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. मात्र असे असताना ठाणे, मुंबई परिसरातून हे परप्रांतीय मजुर शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आलेच कसे ? असा सवाल गाव-पाड्यातील ग्रामस्थांनी उपस्थित केला. ग्रामस्थ हे मजुरांसह स्थानिक प्रशासचा तीव्र विरोध करीत आहेत. त्यामुळे या परप्रांतिय मजुरांच्या जेवणाचा व राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.