ठाणे - घरासमोर उभ्या असलेल्या एका ॲक्टिवा दुचाकीत चट्याबट्याचा साप घुसल्याने दुचाकीस्वाराची चांगलीच धावपळ उडाली. ही घटना कल्याण पश्चिमेला गौरीपाडा परिसरात घडल्याने घराबाहेर दुचाक्या लावणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
बापरे बाप ! ॲक्टिवा दुचाकीत शिरला साप - snake Friend
गौरीपाडा परिसरात राहणाऱ्या अमित म्हात्रे यांच्या ॲक्टिवा दुचाकीत साप आढळला.
गौरीपाडा परिसरात राहणारे अमित म्हात्रे हे अॅक्टिवा दुचाकीने सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर त्यांनी घराबाहेर दुचाकी उभी केली. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास काही कामानिमित्त ते पुन्हा दुचाकी घेऊन बाहेर जाण्यास निघाले असता त्यांना दुचाकीमध्ये चट्याबट्याचा लालसर रंगाचा साप दुचाकीच्या हॅण्डलच्या बाहेर डोकावताना दिसला. या सापाला पाहून त्यांनी दुचाकी सोडून पळ काढला. त्यानंतर काही वेळाने त्यांनी वार संस्थेचे सर्पमित्र हितेश आणि गणेश खंडागळे या दोघांना संपर्क करुन दुचाकीत साप शिरल्याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच दोघेही सर्पमित्र घटनास्थळी पोहचले. मात्र, साप हॅण्डल आणि पुढील टायरच्या मधील भागात लपून बसल्यामुळे तो साप काढण्यासाठी त्यांना खूप वेळ लागला. अखेर त्यांनी हॅन्डलवरचे कवर काढून या सापाला २० ते २५ मिनिटानंतर दुचाकीतून बाहेर काढले. हा चट्याबट्या साप कवड्या जातीचा असून २ फूट लांबीचा आहे. वन अधिकाऱ्याची परवानगी घेऊन आज या सापाला जंगलात सोडण्यात आल्याची माहिती सर्पमित्र हितेश यांनी दिली आहे.