ठाणे -शिवजयंतीचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेने लोकमान्यनगर चैतीनगर येथील विठ्ठल क्रिडा मंडळाच्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पुनर्स्थापना केली. त्याचे लोकार्पण ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते तुतारीच्या गगनभेदी निनादात झाले. याप्रसंगी उपस्थित हजारो शिवभक्तांनी छत्रपतींचा जय जयकार करून त्यांना त्रिवार मानाचा मुजरा दिला.
हेही वाचा -Ramdas Athavale Pune : तिसरी आघाडी झाली तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही - रामदास आठवले
प्रारंभी येथील स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. गेली 40 वर्षे या विभागात केलेल्या लोकोपयोगी कामांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच, लोकमान्यनगरचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास करण्याची ग्वाही दिली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी शिव छत्रपतींच्या आदर्श राज्यकारभाराची गौरवगाथा विशद केली. तसेच, कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने केलेल्या गुणवत्तापूर्ण व अद्वितीय कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली. कोरोना महामारीच्या काळात माझी तब्येत बिघडून मी कोमामध्ये गेलो असता, मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांतून मला वेळीच अत्यावश्यक ती वैद्यकीय सेवा मिळाली. त्यामुळेच मी आज तुमच्या समोर उभा आहे, अशी भावनिक कबुली त्यांनी यावेळी बोलताना दिली. मी आज जिवंत आहे, ते सन्माननीय उद्धव ठाकरेंमुळेच, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार आव्हाड यांनी यावेळी काढले. त्यांची राज्यकारभाराची पद्धत ही शिवकालीन पद्धतीला साजेशी आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.