ठाणे - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमााण आणखी वाढले आहे. गेल्या २४ तासात ४०७ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर महापालिका हद्दीत १५ हजार कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात २३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये केडीएमटीतील चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्राांतील विविध रुग्णालयात एकूण ६ हजार १७२ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ८ हजार ६०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नव्या कोरोना रुग्ण या भागात आढळले!
कल्याण पूर्व -९०, कल्याण प.-१०३, डोंबिवली पूर्व -११९, डोंबिवली पश्चिम-५७, मांडा टिटवाळा- १९, मोहना – २१ तर पिसवली येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.
केडीएमटीतील चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील संजय नजीर तडवी या 41 वर्षीय वाहकाचा कोरोनामुळे बुधवारी 15 जुलै रोजी मृत्यू झाला. जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुुरु होते. संजय तडवी यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली व एक मुलगा असा परिवार आहे. तर त्याचदिवशी वर्णे ता. कर्जत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या वर्णे गावात राहणारे रमेश नारायण नरे या 52 वर्षीय चालकाचा सकाळी मृत्यू झाला. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नरे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले व आई असा परिवार आहे.
परिवहन उपक्रमातील चालक राजेंद्र तळेले यांचा 24 जून व वाहक हुसेन बादशाह कोलार यांचा 28 जून रोजी मृत्यू झाला. सलग 4 कोरोना योद्ध्यांच्या मृत्यूनंतर केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांत, विशेषतः चालक-वाहकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.