ठाणे - एका सोसायटीतील ८ फूट खोल ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडलेल्या ३ श्वानांच्या पिल्लांना अग्निशमन दलाच्या जवानाने कमरेला दोरखंड बांधून पिल्लांना बाहेर काढले आहे. आणि त्यांना जागतिक श्वानदिनीच जीवदान दिले आहे. ही घटना कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली सोसायटीत घडली आहे.
कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली नावाची हायफ्रोफाईल सोसायटी आहे. या सोसायटीमधील एका आठ फूट खोल असलेल्या ड्रेनेजच्या चेंबर्समध्ये श्वानांचे पिल्लं अचानक पडल्याची माहिती कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या कार्यालयात सोसायटीतील रहिवाशांनी दिली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि या पिल्लांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, ड्रेनेजचे चेंबर खोल आणि अरुंद जागेत आहे. पिल्लांच्या जीवघेण्या सारख्या ओरडण्यामुळे फायर ब्रिगेडच्या जवानांचा जीवही कासावीस झाला होता. त्यांनतर क्षणांचाही विलंब न करता, कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करीत खोल चेंबरमध्ये दोरखंड कमरेला बांधून एक जवान उलटा लटकत उतरला. मृत्यूच्या दाढेतून त्या तिन्ही पिल्लांची सुटका केली.
तर पिल्लांच्या जीवावर बेतले असते
विशेष म्हणजे चेंबरमध्ये अडकलेल्या या पिल्लाला बाहेर काढण्यास आणखी थोडा जरी वेळ लागला असता या इवल्याशा पिल्लांच्या जीवावर बेतले असते, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. या तीनही पिल्लांना ड्रेनेज चेंबरमधून बाहेर काढल्यानंतर उपस्थित रहिवांशानी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले. तर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या विनायक लोखंडे, राहुल भाकरे, निखिल इशाने, युवराज राठोड आदींच्या टीमने या ही कामगिरी केली.