ठाणे - शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रताप सरनाईक यांच्या विरोधात भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमैया यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेले अनेक दिवस प्रताप सरनाईक आणि किरीट सोमैया यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला असून आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झाडल्या जात आहेत.
प्रताप सरनाईकांकडून सामान्य ठाणेकरांची फसवणूक -
दोन्ही नेत्यांकडून आव्हान प्रती आव्हान केले जात असून आपलीच बाजू कशी खरी आहे, याविषयी मीडियातून दावे केले जात आहेत. ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर 13 मजल्याच्या विहंग गार्डन नावाने दोन टोलेजंग इमारती प्रताप सरनाईक यांनी 2007 साली बांधल्या. या इमारतींना ठाणे महापालिकेकडून आजतागायत ओसी देण्यात आली नसताना देखील त्यातील सर्व सदनिका विकून प्रताप सरनाईक यांनी सामान्य ठाणेकरांची घोर फसवणूक केल्याचा सनसनाटी आरोप सोमय्या यांनी केला.
सोमैया यांचे प्रताप सरनाईकांना आव्हान १०० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा -
प्रताप सरनाईक यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गुरुवारी 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला. त्याला उत्तर देताना आज सोमैया यांनी आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक वाघुले आणि कार्यकर्त्यांसह वर्तकनगर पोलिसात धाव घेतली. लेखी तक्रारी अर्ज देत प्रताप सरनाईक यांच्यावर भादंवि 420 खाली फसवणुकीची तक्रार दाखल केली. प्रताप सरनाईक यांनी आपल्यावर दाखल केलेला अब्रूनुकसानीचा दावा म्हणजे चोर मचाये शोर असून त्यात दम नसल्याची टीका केली. या दाव्यात अजिबात दम नसून आपण त्यांना आरोप सिद्ध करण्याचे खुले आवाहन देत असल्याचे सोमैय्या यांनी सांगितले.