मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा रोड परिसरात राहणारे वकील हर्ष शर्मा आणि जहागीर इकबाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. गेल्या ४ महिन्यात मीरा भाईंदर फक्त १५ दिवस अनलॉक करण्यात आले होते. त्यामुळे सामान्य माणसाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
प्रशासनाकडून १ जुलै ते १० जुलैपर्यंत कडकडीत बंद करण्यात आले. पुन्हा १० जुलै रोजी मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी एक परिपत्रक काढून लॉकडाऊन १८ जुलैपर्यंत कायम राहणार, असे आदेश जारी केले आहेत. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्या.
मिरारोड परिसरातील वकील हर्ष शर्मा आणि जहागीर इकबाल यांनी दाखल केली जनहित याचिका... हेही वाचा -कोरोनाच्या धसक्याने माणुसकी मेली; पत्नी, मुलाने अंत्यविधीसाठी मृतदेह नेला हातगाडीवर
गेल्या ४ महिन्यात घरी बसलेले सामान्य नागरिक आता त्रस्त झाले आहेत. त्यात आर्थिक संकट उभे राहिले आहे. वारंवार टाळेबंदीमुळे काहींसाठी चूल पेटवणे देखील मुश्कील झाले आहेत. त्यामुळे मीरा भाईंदर शहरातील नागरिक, व्यापारी तसेच सर्व राजकीय पक्षांनी प्रशासनकडे टाळेबंदी उठवण्यात यावी, अशी लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे. कडकडीत टाळेबंदी असताना देखील कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता टाळेबंदी कशासाठी, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.
राज्य सरकारने काही बाबींना सूट देऊन नियमानुसार अनलॉक करण्यात आले आहे. परंतू, मीरा भाईंदरमध्ये वारंवार टाळेबंदीमुळे सामान्य माणसासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. व्यापारी वर्ग सुद्धा लॉकडाऊनच्या विरोधात असून आता टाळेबंदी कोणाला नको, अशी जोरदार मागणी होत आहे. राजकीय नेते फक्त बोलत आहेत, पण कायदेशीर प्रयत्न कोणीही करत नाही. त्यामुळे आम्ही कायदेशीररित्या लॉकडाऊनच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सोमवारी (दि. २० जुलै) रोजी यावर सुनावणी आहे. आज (शनिवार) लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. परंतू, पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आले तर आम्ही न्यायालयात दाद मागू, अशी प्रतिक्रिया ईटीव्ही भारतसोबत बोलताना याचिकाकर्ते वकील हर्ष शर्मा यांनी दिली.