ठाणे - कल्याण पश्चिम परिसरातील विविध मानवी वस्तीमधून तीन विषारी नागांसह दिवड व धामण जातींच्या सापांना वार संस्थेच्या सर्पमित्रांनी सुरक्षित पकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने जंगलात सोडले. वार संस्थेच्या सर्पमित्रांनी आतापर्यंत 100 हून अधिक सापांना पकडून जंगलात सोडून दिले आहे.
कल्याणमध्ये एकाच दिवशी मानवी वस्तीतून 3 नागांसह दिवड व धामण सापांना सर्पमित्रांकडून जीवदान
महिन्याभरापासून कल्याण शहरात अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे सापांनी भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरकाव केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कल्याण शहरात आतापर्यंत 100 पेक्षा जास्त विषारी, बिनविषारी सापांना पकडून वार संस्थेच्या सर्पमित्रांनी जंगलात सोडून त्यांना जीवदान दिले आहे
कल्याण गांधारी रस्त्यावरच एक नाग भक्ष्याच्या शोधात रस्त्याच्या दुभाजकावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना आढळून आला होता, ही माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी जाऊन या नागाला रस्त्याच्या दुभाजकालगत पकडून पिशवीत बंद केले. दुसऱ्या ठिकाणी सर्पमित्र हितेश याने एका मजुराच्या घरातून भांड्यात लपून बसलेला नाग शिताफीने पकडून त्यालाही पिशवीत बंद केले. उबर्डे गावातील रौनक सिटीमधील जिन्याखाली नागाचे पिल्लू कचऱ्यात दडून बसले होते, या नागाच्या पिल्लाला सर्पमित्र हितेश याने पकडले.
सापर्डे गावातील एका बैठ्या घरातील किचनमधील भांड्याच्या मांडणीत एक साप दडून बसला होता, याही सापाला सर्पमित्र हितेशने भांड्यांच्या मांडणीतून पकडले. हा 4 फुटाचा धामण जातीचा साप होता. तर एका घराच्या समोर ओसरीत ठेवलेल्या टेबलच्या मागे अडगळीच्या भागात दिवड जातीचा पाच फुटाचा साप लपून बसला होता. याही सापाला सर्पमित्रांनी पकडून त्याला पिशवीत बंद केले.