बार्शी (सोलापूर) - दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत वाढत असलेली रुग्णसंख्या आणि मृत्यूदर यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीत शहरासह ग्रामीण भागात शिवसेनेच्या वतीने एक ना अनेक उपक्रम राबवले जात आहेत. यामुळे गोरगरिबांना तर लाभ मिळालाच आहे, पण यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिवसेनेच्यावतीने बार्शीत निर्जंतुकीकरण
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंध जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. मात्र, यंत्रणेवरील वाढता ताण आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणी फवारणी करण्याचे काम शिवसेनेच्या वतीने केले जात आहे.
बार्शी शहरासह ग्रामीण भागात गेल्या 15 दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्याअनुषंगाने विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. अखेरीस रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने 10 दिवसाचे कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. केवळ मेडिकल आणि भाजीपाला विक्रीला परवानगी देण्यात आली होती. प्रशासन एकीकडे सर्वतोपरी प्रयत्न करत असताना शहर शिवसेनेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता इंदूताई अन्नछत्रालयच्या माध्यमातून अन्नदानाचे काम सुरू आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निर्जंतुकीकरणची मोहिमही हाती घेगली आहे. गेल्या सहा दिवसापासून शहरातील सर्व कोविड सेंटर तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि गल्ली बोळात सिपीया 200 च्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच फवारणी करण्यात आली होती. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने फववारणीला सुरवात झाली आहे. शहरातील गल्ली बोळात फवारणी करण्यात आली आहे.
चार कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने ही फवारणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. गतवर्षी प्रशासनाचे प्रयत्न आणि स्थानिक पातळीवर राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. यंदाही तशाच प्रकारे कोरोना कमी होईल असा विश्वास शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी व्यक्त केला आहे.