सोलापूर- सोलापूर-पुणे महामार्गावरील सिंहगड क्वारंटाइन सेंटर घाईगडबडीने बंद करुन सक्तीने तेथील रुग्णांना पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे आणणे पालिका व्यवस्थापनच्या अंगलट आले आहे. आजारपणाच्या काळात प्रशासनाने रुग्णांची सोय करायची की गैरसोय असा जाब विचारत रुग्णांनी एकच गदारोळ केला होता. यानंतर पालिका विरोधीपक्ष नेते अमोल शिंदे यांनी क्वारंटाइन सेंटर येथे जाऊन रुग्णांच्या व्यथा जाणल्या आणि या रुग्णांना परत सोयीच्या सिंहगड सेंटरमध्ये पाठवण्यासाठी प्रशासननाला भाग पाडले.
रातोरात सोलापूर महानगरपालिकेचा तुघलकी निर्णय
सोलापूर महानगरपालिका कोरोना काळात अनेक मुद्द्यावर बेफिकरपणे वागत आहे. नागरिकांना व रुग्णांना काय त्रास होतो याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात नाही. असाच एक नमुना शुक्रवारी रात्री घडला. सोलापूर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून अचानकपणे सोलापूर पुणे महामार्गवरील सिंहगड क्वारंटाइन सेंटर बंद करण्याचा निर्णय केला होता. येथे 130 च्या वर रुग्ण उपचार किंवा क्वारंटाइन आहेत. येथे तुलनेने चांगल्या सुविधा आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्रातही 100वर रुग्ण उपचार घेत आहेत. एकाएकी सिंहगड क्वारंटाइन सेंटर बंद करण्याचा सोलापूर पालिकेचा तुघलकी आदेश निघाला. सिंहगड येथे उपचार घेत असलेल्या लोकांची पोलीस प्रशिक्षण केंद्रात सोय होईल की नाही हे बघितले नाही. सर्व रुग्णांना घाईगडबडीत केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आले. यावर काही जणांनी नकार दिला. तेव्हा पोलीस बळाचा वापर करण्यात आला, अशी तीव्र प्रतिक्रिया येथील महिलांनी व्यक्त केली.