सोलापूर - क्वारंटाईन मधील रुग्णांचे मनोबल खचून जाता कामा नये. व त्यांचे एक प्रकारे मनोरंजन व्हावे यासाठी सोलापुरातील सिंहगड येथील क्वारंटाईन सेन्टर मध्ये संगीत महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी क्वारंटाईन झालेल्या रुग्णांनी मनसोक्त आनंद घेत झिंगाट नाच केले. या कार्यक्रमात महिला,पुरुष वृद्ध,लहान मुलांनी देखील सहभाग घेत नाचत गात कार्यक्रमाचा आनंद घेतला.
रुग्णांसाठी सोलापुरात संगीताचा कार्यक्रम सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सेल मार्फत रविवारी (2 ऑगस्ट रोजी) सोलापूर केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये हा संगीत महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला होता. क्वारंटाईन मध्ये दाखल असलेल्या कोरोना रुग्णांच्या मनोरंजनासाठी, त्यांचे मनोबल वाढण्यासाठी हे कार्यक्रम संपन्न झाले. राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे शहर प्रमुख आशुतोष नाटकर आणि कार्याध्यक्ष जब्बार मुर्शिद यांच्या प्रमुख अायोजनात व महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्या शुभहस्ते सदर सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी शहरात असलेल्या वालचंद कॉलेज महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटरमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तिथे दाखल असलेल्या अनेक रुग्णांनी आपल्या मरणयातना माध्यमांसमोर व अधिकाऱ्यासमोर व्यक्त केल्या होत्या. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सक्तीने राबविले जात आहे. होम क्वारंटाईन खूप कमी ठिकाणी केले जात आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्याना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले जात आहेत. इच्छा नसताना देखील विलगिकरण केले जात आहे, अशा अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. या ठिकाणी सोयीसुविधा नाहीत, मरण यातनेचे जीवन जगण्याची वेळ आली आहे, अशा अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. विलगीकरणा तुन नैराश्य निर्माण होत आहे. त्यासाठी सिंहगड येथील कोरोना क्वारंटाईन सेंटर मध्ये रविवारी संगीत महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला होता. या वेळी विलगीकरणातील रुग्णांनी याचा मनसोक्त आनंद लुटला. सैराट मधील झिंगाट गाण्यावर डान्स केला.
शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी या सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यास महापालिकेने सहकार्य केले म्हणून ह्या अनोख्या उपक्रमाबद्दल आभार मानले. यावेळी मिलिंद गोरे व युवराज माने , राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहराध्यक्ष आरती हुळ्ळे, प्रकाश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.