पुणे- देशातील विविध राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दुसरी लाट ओसरल नसताना तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका वर्तवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमिवर पुण्यातील पाहिले लहान मुलांचे कोविड सेंटर येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे उभारण्यात आले आहे. येथे कोविड बाल कक्ष देखील उभारण्यात आले आहे.
विविध खेळणीसह लहान मुलांसाठी ५० बेड तयार-
सीवायडीए, बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संघ, सौ. शीला राज साळवे ट्रस्ट, पुणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. पाच मजली या वसतीगृहाच्या पहिल्या मजल्यावर लहान मुलांसाठी ५० बेड तयार करण्यात आले आहेत. लहान मुलांसह त्यांच्या पालकांचीही राहण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. या मुलांसाठी स्वतंत्र भोजन कक्ष, खेळणी तसेच कार्टुनचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या ठिकाणी ऑक्सिजन कक्षही निर्माण करण्यात आला आहे. रुग्णाला त्वरित तात्पुरत्या स्वरुपात ऑक्सिजन देवून बिकट परिस्थीतीतून बाहेर काढण्यासाठी या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.