पुणे : एमपीएससी परीक्षेच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. एमपीएससीची परीक्षा 21 मार्च रोजीच घेतली जावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.
21 तारखेलाच परीक्षा घ्यावी
पुण्यात पत्रकारांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. एमपीएससीची परीक्षा नियोजनानुसार 21 तारखेलाच घेतली जावी. जर या तारखेला परीक्षा घेतली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी लाईव्हमध्ये परीक्षेची तारीख का घोषित केली नाही. त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळावरूनही टीका
आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळावरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाची कबुली स्वतः आरोग्य मंत्र्यांनीच दिली आहे. त्यामुळे सरकारचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. राज्य सरकारचे नियोजन नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
21 मार्च रोजीच होणार परीक्षा
दरम्यान, रद्द झालेली राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 मार्च रोजी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच १४ मार्चच्या ऑनलाईन अर्जप्रणालीवर परीक्षार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे आयोगाने म्हटले आहे. याशिवाय २७ मार्चला आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० तसेच ११ एप्रिलला आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन परीक्षा नियोजित तारखांना घेतल्या जाणार आहेत. यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे आयोगाने प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.