पुणे -अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील प्राणिसंग्रहालयात एका वाघाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. भारतीय केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने भारतातील प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन विशेष सूचना पत्र काढले आहे. त्यानुसार प्राण्यांच्या आरोग्याची विशेष खबरदारी घेतली जात आहे.
कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता कात्रज प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय 130 एकर परिसरात पसरले आहे. यात वाघ, सिंह, बिबटे, हत्ती यासारख्या 63 प्रजातींचे 440 हून अधिक वन्य प्राणी आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या सर्व प्राण्यांचीही विशेष खबरदारी घेतली जात आहे. या सर्व प्राण्यांचे दरवर्षी लसीकरण केले जाते. दर तीन महिन्यांनी या प्राण्यांना जंतूनाशक औषध दिली जातात. विष्ठा तपासली जाते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या प्राण्यांच्या दररोजच्या हालचाली टिपून ठेवल्या जात आहेत.
या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 100 हून अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन प्राणिसंग्रहालय परिसर निर्जंतुक करण्यात आले आहे. प्राण्यांना फिडिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्क्रिनिंग केल्यानंतरच त्यांना आत प्रवेश दिला जातो. प्राण्यांच्या खाद्यांना हात लावण्यापूर्वी हॅन्ड ग्लोज वापरणे, फेस मास्क वापरणे, गम बूट वापरणे, हात साबणाने धुणे हे सर्व केल्यानंतरच त्यांना प्राण्यांजवळ जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय कर्मचाऱ्यांची वाहने, खाद्यपदार्थ घेऊन येणारी वाहनांचे निर्जंतुकीकरण केल्याशिवाय आत प्रवेश दिला जात नाही.
प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव म्हणाले, या प्राण्यांची निगा राखण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकारी, अनिमल किपर आहेत. या प्राण्यांसाठी काम करणारा कर्मचारी वर्ग प्रशिक्षित आहे. हे सर्व कर्मचारी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या गाईडलाईननुसार काम करतात. त्यामुळे कुठल्याही प्राण्याला श्वसनासंबधी आजार उद्भवल्यास अथवा त्याने खाण्यास नकार दिल्यास अथवा कोरोना विषाणूच्या संदर्भातील कुठलीही लक्षणे आढळली तर तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यास सांगितले आहे. जेणेकरून पुढील उपाययोजना केल्या जातील..