पुणे - सद्यस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत एकच विषय असतो, तो म्हणजे शरद पवार! मला काळजी वाटते, की कदाचित मोदी झोपेतही शरद पवार म्हणूनच बडबडतील , अशी बोचरी टीका शरद पवार यांनी मोदींवर केली आहे. ते दौंड येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील सभेत शरद पवारांवर सातत्याने टीका करत आहेत. याला प्रत्युत्तर देत शरद पवारांनी दौंड येथील सभेत मोदींवर सडकून टीका केली. ते म्हणाले, सत्ताधारी लोक आम्हाला विचारतात, गेल्या सत्तर वर्षात तुम्ही काय केले ? परंतु गेली पाच वर्षे नरेंद्र मोदींची सत्ता आहे, यापूर्वी अटलजींची सत्ता होती, अशी दहा वर्षे भाजप व मित्रपक्षांची सत्ता देशावर राहिलेली आहे. आता या लोकांना विचारण्याची वेळ आली आहे. दहा वर्षाच्या काळात तुम्ही काय दिवे लावले, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
शरद पवार दौंडमधील सभेत बोलताना
शेतकऱ्यांबाबतचे धोरण चुकीचे
या सरकारचे शेतकऱ्यांबाबतचे धोरण चुकीचे असल्याचा आरोपही पवारांनी केला. शेतमालाला अडीचपट किंमती वाढून देतो, असे भाजपने आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता सरकारने केली नाही. देशामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज वाढले आहे. मोदी सरकारच्या काळात तब्बल ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपचा समाचार घेताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सध्या भाजपचे अनेक नेते आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बारामतीत येऊन ठाण मांडावे लागले आहे. यातच आमचे यश आहे. भाजपचे लोक बारामतीत येऊन आम्ही ६० वर्षात काय केले हे विचारतात. तेच लोक काँग्रेस-राष्ट्रवादीने काढलेल्या शाळांमधूनच साक्षर झाले आहेत. या लोकांनी लक्षात घ्यावे शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी जे केले ते कोणीच केले नाही. शरद पवारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती, असेही खासदार सुळे यावेळी म्हणाल्या.