पुणे - देशासह राज्यात असलेल्या कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सेवा बंद आहे. मात्र, पुण्यातील अनेक चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पुणे ते मुंबई रेल्वे सेवा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत डेक्कन क्वीन सुरू करावी, अशा आशयाचे निवेदन पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवाशी संघाचे अध्यक्ष इकबाल मुलाणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून मुंबईला नोकरी करणाऱ्यांची संख्या दीड हजारावर आहे. कोरोनाच्या अगोदर परिस्थिती वेगळी होती. हे सर्व नोकरदार सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्विन, प्रगती एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस तसेच नांदेड पनवेल एक्सप्रेस या गाडयांनी मुंबईहून ये-जा करत असत. मात्र कोरोनामुळे परिस्थती बदलली असून गेल्या मार्च महिण्यापासून रेल्वे सेवा बंद आहे. परंतु, लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर अनेक नोकरदारांना उपस्थित राहणे बंधनकारक केले असून रेल्वे सेवा बंद असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असे मुलाणी यांनी सांगितले. अनेक प्रवासी जीव मुठीत घेऊन पुणे- मुंबई हा प्रवास दुचाकीवरून करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसा उल्लेख त्यांनी निवेदनात केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रेल्वेशी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले आहे. त्यामुळे याच्यावर लवकरात लवकर विचार करावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशी संघ पिंपरी-चिंचवडने केली आहे.