पुणे -पुण्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अगदी शुन्यापर्यंत गेलेली रुग्णांची संख्या ही ८ हजारांच्यावर गेली आहे. अशात पुणे महानगरपािका प्रशासन कितपत सज्ज आहे हा देखील एक प्रश्नच आहे. कारण कोरोनाची ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अगदी काही दिवसांपूर्वीच महापालिकेने बंद पडलेले जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करायचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे महापालिकेने बनवलेले हॉस्पिटल मात्र बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
दीड वर्षापासून बांधलेले हॉस्पिटल बंदच; उपयोग काय? दीड वर्ष हॉस्पिटल बंदच
पुण्यातील हडपसर भागातील ससाणे नगरमध्ये असलेला रोहन काळे हॉस्पिटल बंदच आहे. गेल्या वर्षी पुणे महापालिकेच्या भवन रचना विभागाने आपल्याच जागेत तब्बल २ कोटी रुपये खर्च करून हडपसर येथे १७ हजार स्क्वेअर फुटचा एक हॉस्पिटल बांधले आहे. ते हॉस्पिटल मागच्या जानेवारीत पूर्ण करून महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आले आहे. मात्र तो अजूनही बंदच आहे. महापालिकेने हे हॉस्पिटल सुरूच केले नाही.
काय आहे प्रकरण
गेले दोन वर्षे पुणे शहरात करोना महामारीमुळे आरोग्य सेवेवर ताण आला आहे. रुग्णांना खाजगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर खर्च करून उपचार घ्यावे लागले आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेचा स्वत:चे हॉस्पिटल सुरू करणे आवश्यक होते. मात्र तो आजही सुरु होऊ शकलेला नाही. एकीकडे महापालिका ऍमेनिटी स्पेस विकायला निघाली आहे. इथे महापालिकेने नागरिकांच्या करांचे दोन कोटी रुपये खर्च करून ऍमेनिटी स्पेस मध्ये बांधलेल हॉस्पिटल आजही वापराविना पडून असल्याची तक्रार सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुणे महानगपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना केली आहे. तर दुसरीकडे काही अडचणींमुळे हे हॉस्पिटल बंद असून लवकरच ते सुरू करण्यात येणार असून विरोधक फक्त राजकारण करत असल्याची टीका स्थानिक भाजपा नगरसेवक आबा तुपे यांनी केली आहे.