पुणे- कोरोना रुग्णांवरील उपचाराचे अव्वाच्या सव्वा बिल घेणाऱ्या खासगी रुग्णालयांना पुणे महापालिकेने चांगलाच चाप लावला आहे. कोरोनाच्या सुरुवातीला पुण्यातील खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून रुग्णांना मोठ्या प्रमाणात बिल येत होते. त्यांच्या या बिलाचे ऑडिट होत नव्हते. त्यामुळे महापालिकेने या रुग्णालयांचे ऑडिट करून गेल्या नऊ महिन्यांतील सुमारे आठशे रुग्णांना सव्वातीन कोटी रुपये परत मिळवून दिले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे.
सव्वातीन कोटी रुपये परत मिळवून दिले -
कोरोना रुग्णांना महापालिकेच्या दवाखान्यात दाखल केल्यास खर्च येत नाही. मात्र खासगी दवाखान्यात दाखल केल्यास पीपीई किट, ग्लोज, मास्क यापासून सर्वच गोष्टींचे पैसे रुग्णांच्या नातेवाइकांना द्यावे लागतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत खासगी रुग्णालयांनी वाढीव पैसे घेतल्याने नागरिकांची मानसिक तसेच आर्थिक कोंडी होत होती. रुग्णालयांनी जादा पैसे घेतल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने महापालिकेने खासगी रुग्णालयांच्या बिलाची तपासणी करण्यासाठी रुग्णालयांमध्ये पालिकेचे ऑडिटर नेमण्याचा निर्णय घेतला. त्या माध्यमातून तब्बल १२०० लोकांच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या आणि दीड लाखावरील सर्व बिले तपासून रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा दिला आहे, अशी माहिती महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली आहे.